पुणे: शेतकऱ्यांना (Farmers) पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना आखत आहे. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Nidhi Yojana). या योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे .पीएम किसान पोर्टलवर शेतकऱ्यांनी चुकीचा मोबाइल नंबर दिला असल्यास तो आता १५ सप्टेंबरपर्यंत बदलता येणार आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे दीड हजार शेतकऱ्यांचे मोबाइल नंबर चुकीचे असल्याचे आणि एकापेक्षा अधिक असल्याने अशा शेतकऱ्यांना यात दुरुस्ती करता येणार आहे. 


पुणे शहरात सर्वाधिक २४२ शेतकरी हे जुन्नर तालुक्यातील आहेत. तसेच ६८३ शेतकऱ्यांचे आधार क्रमांक एकापेक्षा अधिक असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. दरम्यान, १० हजार ७९ शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेले नाही.


5 हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित 


पुणे जिल्ह्यात ४ लाख ४९ हजार ५८५ शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेत नोंदणी केली आहे, त्यातील ९९ टक्के अर्थात ४ लाख ४४ हजार ८३१ शेतकऱ्यांनी ई - केवायसी पूर्ण केले आहे. अजून ४ हजार ७५४ शेतकऱ्यांचे ई-केवायसी झालेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना पीएम किसान निधीचा १७वा हप्ता मिळालेला नाही.


शेतकऱ्यांचे लटकले पीएम किसान


आधार पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांपैकी ४ लाख ३५ हजार ९१५ शेतकऱ्यांनी आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेले आहेत. त्यामुळे १० हजार ७९ शेतकऱ्यांचे पीएम किसान व नमो सन्मान योजनेचे पैसे रखडले आहेत.


मोबाइल क्रमांक दुरुस्तीसाठी १५ सप्टेंबरची मुदत


शेतकऱ्यांचे मोबाइल क्रमांक चुकले असल्यास किंवा एकच क्रमांक अनेक नोंदणीसाठी वापरले असल्यास असे मोबाइल क्रमांक दुरुस्तीसाठी १५ सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात असे १ हजार ५५२ शेतकऱ्यांचे क्रमांक दुरुस्तीसाठी रखडले आहेत. त्यांनी ते दुरुस्त करावेत.


ऑक्टोबरमध्ये जमा होणार PM किसानचा 18 वा हप्ता


शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीला हातभार लावणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे  लाभार्थी आता 18 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या योजनेंतर्गत, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून शेतकरी त्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करु शकतील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील. आतापर्यंत सरकारने 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. 18वा हप्ताही पुढील महिन्यात जाहीर केला जाऊ शकतो. 
 


ई-केवायसीची प्रक्रिया सोपी


ई-केवायसीची प्रक्रिया आता खूप सोपी आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सुरू केलेल्या पीएम किसान मोबाइल ॲपमध्ये 'फेस ऑथेंटिकेशन फीचर' उपलब्ध आहे. या फीचरच्या मदतीने शेतकरी आता घरी बसून OTP किंवा फिंगरप्रिंटशिवाय चेहरा स्कॅन करून ई-केवायसी करू शकतात.दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी ही पद्धत अतिशय सोयीची आहे. याशिवाय, शेतकरी त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSCs) भेट देऊन बायोमेट्रिक केवायसी देखील मिळवू शकतात. जर शेतकरी स्वत: OTP द्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करत असेल, तर ते विनामूल्य आहे, जर त्याने कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन केवायसी केले तर त्याला काही शुल्क भरावे लागेल.