पुणे : प्लास्टिकबंदीमुळे सगळ्यांचीच गोची झाली आहे. मात्र हिच संधी साधत पुण्यात पाट्या झळकू लागल्या आहेत. या पाट्यांमुळे हॉटेलमध्ये पार्सलसाठी जाणाऱ्या ग्राहकांना चांगला मनस्ताप सहन करावा लागत आहे.


वास्तविक, पूर्वी एखादा पातळ पदार्थ घरी घेऊन जायचा असेल, तर घरातून भांड न्यावं लागत नसे. पण राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर, पुण्यात पार्सलसाठी आता हॉटेल किंवा खानावळीमध्ये डबे घेऊन जावे लागत आहेत.

सध्या पुण्यातील पेठांमधल्या खानावळी आणि हॉटेल चालकांनी प्लॅस्टिकबंदीवर स्वतचा मार्ग शोधला आहे. भाजीसाठी डबा आणा, अशा सूचनांच्या पाट्या अनेक हॉटेल आणि खानावळीबाहेर झळकत आहेत. त्यामुळे ग्राहकांना पार्सलसाठी स्वत: घरातून पिशव्या घेऊन जावं लागत आहे.

प्लास्टिक बंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकारने राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपरिषदांवर आहे. त्यानुसार पुणे महापालिकेने आत्तापर्यंत 12 मेट्रिक टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. प्लास्टिकचा वापर करताना किंवा विक्री करताना कोणी आढळला, तर त्याला पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.

त्यामुळे कारवाईच्या या बडग्यामुळे हॉटेल आणि भाजी मंडईत खरेदीसाठी पुणेकर घरून पिशव्या घेऊनच बाहेर पडत आहेत.

दरम्यान, आगामी काळात प्लॅस्टिकबंदीचा भार पुन्हा ग्राहकांच्याच खिशावर पडणार आहे. कारण, हॉटेलमधून पार्सल मागवताना पर्यावरणपूरक डब्यांसाठी ग्राहकांना 25 ते 30 टक्के जादा पैसे मोजावे लागणार आहेत.