पिंपरीत दहावीच्या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या
एबीपी माझा वेब टीम | 13 Mar 2018 10:42 AM (IST)
वेदांत रात्री साडेबारा वाजता अभ्यास करुन मैत्रिणीला घरी सोडायला गेला होता, तिथून परतताना त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला
NEXT PREV
पिंपरी चिंचवड : अभ्यासानंतर मैत्रिणीला घरी सोडून परतणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास वेदांत भोसलेला भोसकण्यात आलं. दहावीत शिकणारा वेदांत आणि त्याची मैत्रीण वेदांतच्या घरी परीक्षेचा अभ्यास करत होते. रात्री बारा वाजताच्या सुमारास अभ्यास करुन झाल्यावर वेदांत मैत्रिणीला घरी सोडायला गेला. तिला सोडून परत येताना वेदांतवर एका व्यक्तीने चाकूने हल्ला केला. काही नागरिकांनी वेदांतला रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पिंपरी चिंचवडच्या पूर्णानगर भागात रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. निगडी पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. अल्पवयीन मुलावर हल्ला होण्याची दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. सोमवारी सकाळी अकरावीतील रुपेश गायकवाडवर हल्ला झाला. रुपेशवर चक्क जैन महाविद्यालयातच हल्ला झाला होता.