पिंपरी चिंचवड : शहरातील स्वयंघोषित भाईंकडून सोशल मीडियावर दहशत माजविण्याचा नवा पायंडा पडलाय. पण हा पायंडा मोडीत काढून, या स्वयंघोषित भाईंची मस्ती उतरविण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी नवा पॅटर्न राबविलाय. या पॅटर्नमुळं या स्वयंघोषित भाईंनी पोलिसांसमोर अक्षरशः गुडघे टेकलेत.
"आमची सूत्र थेट येरवडा जेल मधून हलतेत, लावा ताकद" सोशल मीडियावरून विरोधी टोळींना असं आव्हान देणं असो, कुछ दिन और सही, बहोत बडा धमाका होगा, असे नमूद करत थेट पोलिसांना आव्हान देणं असो की कोयते अन् बंदुकी नाचवत फिम्ली डायलॉगबाजी असो. पिंपरी चिंचवडमध्ये सध्या सोशल मीडियाद्वारे समाजात दहशत पसरविण्याचा हा नवा पायंडा सुरु आहे. पण आता याच स्वयंघोषित भाईंचा माज पोलिसांनी देखील थेट सोशल मीडियावर उतरवायला सुरुवात केलीये.
कोयता, गावठी पिस्तूल नाचवत समाजात दहशत माजविणाऱ्यांना सुतासारखे सरळ करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी नवी पॅटर्न तयार केलाय. पोलीस अशा स्वयंघोषित भाईंना थेट बेड्या ठोकून ते ज्या परिसरात सोशल मीडियावर दहशत पसरवितात तिथंच त्यांची वरात काढतायेत. शिवाय आधी माजविलेली दशहत अन् नंतर पोलिसांनी उतरविलेला माज असा एकत्रित व्हिडीओ बनवून, तोही सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी या महिन्यात असे दहा गुन्हे दाखल केलेत. त्यात अठरा स्वयंघोषित भाईंना बेड्या ठोकल्या, पाच लोखंडी पिस्तूल, सहा जिवंत काडतूस अन् सात लोखंडी कोयते जप्त केलेत. यापुढे देखील सोशल मीडियावर अशा प्रकारे कोणी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला तर त्या स्वयंघोषित भाईंना देखील समाजासमोर गुडघे टेकायाला लाऊ, असा इशारा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी इशारा दिलाय. भूरटेगिरी करणाऱ्या स्वयंघोषित भाईंची मस्ती अशीच जिरवायला हवी. त्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी राबविलेल्या हा नवा पॅटर्न राज्यात राबवायला हवा, अशी मागणी आता नागरिक करत आहेत.