पिंपरी चिंचवड : शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण आणि जबरदस्तीने लघवी पाजण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. आपण रागाच्या भरात अशी तक्रार दाखल केल्याचा लेखी जबाब संबंधित महिलेने पोलिसांना दिला आहे.
आधी असा गुन्हा नोंदवला होता!
हिंजवडी परिसरात शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी मी गेले असता, मला मारहाण करत जबरदस्तीने लघवी पाजण्याचा प्रयत्न केला. म्हणून या प्रकरणी आठ व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करावा.
काय आहे प्रकरण?
संबंधित महिलेने शनिवारी (21 मे) हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीनुसार शेजारी राहणाऱ्या भावकीतील व्यक्तीकडून शिवीगाळ झाल्यानंतर संबंधित महिला सासऱ्यासोबत जाब विचारण्यासाठी गेली होती. आम्हाला शिवीगाळ का केली असा जाब तिने विचारला. यावेळी आरोपींनी महिला आणि तिच्या सासऱ्यांना लाथाबुक्क्या, चपला आणि काठीने मारहाण केली नाही. एवढंच नाही तर आरोपीनी बाटलीमध्ये लघवी गोळा करुन आपल्याला पाजण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी महिला आणि सासऱ्याला खोलीत डांबून ठेवलं होतं.
खरंतर 15 मे रोजी सूसगाव या ठिकाणी दुपारी हा प्रकार घडला होता. घडलेल्या प्रकारामुळे महिला आणि तिचे सासरे तणावात होते. या धक्क्यातून सावरत महिलेने 21 मे रोजी पोलिसात धाव घेतली आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर हिंजवडी पोलीस ठाण्यात चार महिलांसह आठ जणांवर विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
परंतु आता महिलेने पोलिसांना दिलेल्या लेखी जबाबात आपण रागाच्या भरात अशी तक्रार दाखल केल्याचं म्हटलं आहे.