पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये भंडारा उधळून चिखल झाल्याप्रकरणी नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. महापालिकेने या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महात्मा फुलेंच्या वेशात आलेले राहुल जाधव महापौर आणि सचिन चिंचवडे उपमहापौर झाल्याची घोषणा होताच, पालिका आवारात भंडारा उधळून एकच जल्लोष करण्यात आला होता.
मात्र जल्लोषाच्या वेळी भाजप कार्यकर्त्यांचा उन्माद पाहायला मिळाला. महापालिकेच्या आवारात जेसीबी आणि जिप्सीवर उभं राहून तब्बल 50 ते 60 पोती भंडारा उधळण्यात आला होता. जमिनीवर भंडाऱ्याचे थर लागले होते तर पालिका इमारतीत सर्वत्र भंडारा पसरला होता. यामुळे पालिकेसह परिसरात अस्वच्छता निर्माण केल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला.
पावसामुळे या उधळलेल्या भंडाऱ्याचा चिखल झाला. त्यामुळे रस्त्यावरुन वाहनं चालवणं तर सोडा पण साधं चालताही येत नव्हतं. चिखलात तब्बल आठ ते दहा वाहनं घसरली. तर पादचाऱ्यांचा चालतानाही तोल जात होता. शेवटी रस्त्यावरचा हा चिखल हटवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं.
नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांचा पहिलाच दिवस असा त्रास देणारा ठरल्याने पालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला. कार्यकर्ते सत्ताधाऱ्यांशी निगडित असल्याने, प्रशासनाने अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्याची खबरदारी घेतली.
महापौरांच्या खुर्चीवर पहिल्यांदाच रिक्षाचालक व्यक्ती विराजमान झाली आहे. रिक्षाचालक ते महापौर असा खडतर प्रवास राहुल जाधव यांनी केला आहे. भाजपच्या इतिहासातील पिंपरी चिंचवडचा दुसरा महापौर होण्याचा मान राहुल जाधव यांना मिळाला.