पुणे : अवैधरित्या जमीन खरेदी प्रकरणी आयआरबी कर्मचाऱ्यांना दोषमुक्त करण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सीबीआय हायकोर्टात जाणार आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांनी आयआरबीविरोधात अवैधरित्या जमीन बळकावल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतरच सतीश शेट्टी यांची हत्या झाली.

सतीश शेट्टी यांनी ज्या आयआरबी कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दिली होती, त्या सर्वांना विशेष न्यायालयाने दोषमुक्त केलं. त्यामुळे या निर्णयाविरोधात सीबीआय हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे.

काय आहे प्रकरण?

आयआरबीकडून एक्सप्रेस वे लगतच्या जमिनी अवैधरित्या बळकावल्या जात असल्याची तक्रार सतीश शेट्टी यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीमध्ये आयआरबी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह दत्तात्रय गाडगीळ, अजित कुलकर्णी आणि ज्योती कुलकर्णी या आयआरबी कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांच्या नावाचा समावेश होता.

दरम्यान, आयआरबी प्रकरणात सीबीआयने व्यवस्थित तपास न केल्यानेच न्यायालयाने म्हैसकर आणि इतरांना दोषमुक्त केल्याचा आरोप सतिश शेट्टी यांचे बंधू संदीप शेट्टी यांनी केला होता. मात्र आता सीबीआयने विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध  हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.