पिंपरी चिंचवड : सुट्टीच्या काळात आपली मुलं कुठे आणि काय खेळतात याकडे पालकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पिंपरीत घरामध्ये खेळता खेळता आठ वर्षांच्या मुलाला गळफास बसला आणि त्याचा मृत्यू झाला.


नकुल कुलकर्णी असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव होतं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अवघ्या काही दिवसांवर नकुलची मुंज येऊन ठेपली होती.

पिंपरी-चिंचवडच्या निगडीमध्ये सोमवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. घरात नकुलचे आजी-आजोबा हॉलमध्ये बसले असताना नकुल आतल्या खोलीत खेळत होता. खुंटीला अडकवलेल्या इलॅस्टिकसोबत तो स्टंट करत होता. याच इलॅस्टिकमध्ये त्याचा गळा अडकला आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला.

बराच वेळ नकुल बाहेर न आल्यामुळे कुटुंबीयांनी दरवाजा ठोठवला, तरीही आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर दाराचं लॉक तोडण्यात आलं, तेव्हा इलॅस्टिकमध्ये गळा अडकलेला नकुल मृतावस्थेत आढळला.

नकुलची मुंज काही दिवसांवर आल्यामुळे त्याचं आमंत्रण देण्यासाठी त्याचे आई-वडील घराबाहेर गेले होते, तर आजी-आजोबा घरात उपस्थित होते.

यापूर्वीही राज्यात अनेक ठिकाणी गळफास बसून चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.