पुणे : हिट ऍण्ड रन प्रकरणांमध्ये (Pimpari Hit And Run Case) पिंपरी चिंचवड पोलिस हलगर्जीपणा का दाखवतायेत? गुन्हा दाखल करण्याऐवजी डोळेझाक का करतायेत? असे प्रश्न उपस्थित झाले. मोशीतील या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही बातम्यांमध्ये झळकले अन् उपस्थित प्रश्नांची उत्तरं ही मिळत गेली. कारण यातील कार चालक हा पोलिसांचा मुलगा असल्याचं आता समोर आलंय. त्यामुळंच इतका भीषण अपघात होऊनही पोलिस झोपेचं सोंग का घेत होते याचं उत्तर ही मिळालं. यानिमित्ताने पिंपरी चिंचवड पोलिसांचा आणखी एक 'कार'नामा समोर आलाय. 


आरोपी ड्रायव्हर निघाला पोलिसाचा मुलगा


विनय नाईकरे असं या आरोपी चालकाचे नाव आहे. तो पोलीस हवालदार विलास नाईकरे यांचा मुलगा असून ते सध्या भोसरी एमआयडीसी पोलिसांत कार्यरत आहेत. याच पोलीस स्टेशनची हवा मुलगा विनयला खावी लागत आहे. मात्र यानिमित्ताने पोलीस आयुक्त विनायकुमार चौबेंच्या अखत्यारीत असणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांचं चाललंय तरी काय? असा प्रश्न विचारला जातोय.


विनय हा मोशीतील रस्त्यावर बेदरकारपणे कार चालवत होता. त्याचवेळी फिर्यादी यांची पत्नी आणि मुली या रस्ता ओलांडत होत्या. विनय मात्र त्याच्याच  धुंदीत होता. कारण रस्ता ओलांडणाऱ्या फिर्यादीच्या कुटुंबीयांना विनयच्या बाजूने येणाऱ्या दुचाकीस्वाराने पाहिलं आणि आपला वेग कमी केला. मात्र विनय सुसाट वेगात आहे तसाच आला आणि त्याने फिर्यादीच्या पत्नीला धडक दिली. 


व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग


ही धडक इतकी जोराची होती की यात फिर्यादीच्या पत्नी बराच दूर फेकल्या गेल्या. विनय मात्र न थांबताच निघून गेला. फिर्यादीच्या पत्नी मात्र यात गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी (12 जून) दुपारी साडे तीनच्या सुमारास घडलेल्या अपघाताचा सीसीटीव्ही 24 तासानंतर समोर आला, त्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या. मग झोपलेल्या पोलिसांना जाग आली. 


कारचा चालक हा पोलीस हवालदार विलास नाईकरे यांचा मुलगा असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांचा हा निष्काळजीपणा का सुरू होता आणि ते झोपेचं सोंग का घेत आहेत या प्रश्नांची उत्तरं मिळाली. आता भोसरी एमआयडीसी पोलिसांनी तब्बल 24 तासांनी गुन्हा दाखल करत विनयला बेड्या ठोकल्या. 


गुन्हा दाखल करण्यास नकार 


गुन्हा दाखल करायला उशीर का केला? असा प्रश्न पोलिसांना विचारण्यात आला असता अपघातानंतर चालक विनय हा परत अपघातस्थळी आला आणि त्याने जखमी महिलेस रुग्णालयात दाखल केले असं सांगण्यात आलं. त्यानंतर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी जवाबही घेतला. मात्र फिर्यादी आणि जखमींनी आमची कोणतीही तक्रार नाही असं म्हणत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. म्हणून अपघातानंतर गुन्हा दाखल करण्यात आला नाही असा दावा भोसरी एमआयडीसी पोलिसांनी केला. 


पोलिसांनी फिर्यादीला धमकावल्याची शंका


आता एकवेळ हा दावा खरा मानला तरी फिर्यादीने पत्रकारांशी बोलू नये याची पोलिसांनी चांगलीच तजवीज केलेली दिसली. फिर्यादीला अपघातादिवशी नेमकं काय घडलं? आरोपी चालकाने खरंच मदत केली का? या प्रश्नांची उत्तरं फिर्यादीकडून जाणून घेण्यासाठी एबीपी माझाने फोन केला. मात्र पत्रकार बोलतोय, असं ऐकताच फिर्यादीने फोन कट केला अन तातडीनं फोन स्विच ऑफ करून टाकला. यावरून भोसरी एमआयडीसी पोलिसांनी फिर्यादीला धमकावल्याची शंका उपस्थित केली जात आहे. 


पुण्यातील कल्यानीनगर अपघातात पोलिसांची पोलखोल झाली होती. त्यातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी काहीच धडा घेतला नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं. कारण एकामागोमाग एक हिट अँड रनचे प्रकार समोर येत आहेत. मात्र पिंपरी चिंचवड पोलिस यातील चालकांना वाचवण्यासाठी वेगवेगळे 'कार'नामे करताना दिसतायेत. त्यामुळं पोलिस आयुक्त विनयकुमार चौबेंच्या अखत्यारीत असणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांचं नेमकं चाललंय तरी काय? चौंबेंचा पोलिसांवर वचक राहिला नाही का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.


ही बातमी वाचा: