पिंपरी-चिंचवड : कोरोना रुग्णांसाठी रेमडिसिवीर प्रमाणेच प्लाझ्मा थेरपी ही वरदान ठरते. पण प्लाझ्माचा ही प्रचंड तुटवडा जाणवू लागलाय. याला कारण ठरतंय ते प्लाझ्मा दान करणाऱ्यांची उदासीनता. याचा परिणाम हा थेट कोरोना रुग्णांच्या जीवावर बेताताना दिसतोय. त्यामुळे हा तुटवडा मिटविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. प्लाझ्मा दान करणारे पुढे यावेत म्हणून प्लाझ्मा दान करणाऱ्यांना प्रोत्साहनात्मक दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. जेणेकरून मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा दान व्हावा आणि कोरोना रुग्णांचा जीव वाचावा, असा यामागचा हेतू असल्याने महापालिकेने हा निर्णय घेतलाय. पण हे प्लाझ्मा तुम्हाला महापालिकेच्या रक्त पेढीतच दान करावे लागणार आहे. शिवाय पालिका रुग्णालयाबाहेरच्या रुग्णांना देखील प्लाझ्मा मोफत दिला जाणार आहे. आत्ता 200 मिलीसाठी सहा हजार रुपये घेतले जायचे.


पिंपरी चिंचवडसह राज्यातील अनेक कोरोना रुग्ण हे प्लाझ्मा अभावी दगावू लागलेत. ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे, वेळोवेळी ती अधोरेखित देखील होत आहे. यासाठी शासन पातळीवरून कोरोनामुक्त झालेल्या बाधितांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलं जातंय. पण त्यांच्यातली उदासीनता उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. प्लाझ्मा दान केल्याने त्यांच्यातील अॅन्टी बॉडीज कमी होतील, त्यांना थकवा जाणवेल असे अनेक गैरसमज त्यांच्यात आहेत. पण प्लाझ्मा दान केल्याने असा कोणताही धोका उद्भवत नाही हे मुळात लक्षात घ्यायला हवं. उलट कोरोनामुक्त झालेल्या बाधितांना प्लाझ्मा दान करून, एक दोघांचे नव्हे तर कमीतकमी बारा जीव वाचविता येणार आहे. अशा कोरोना बाधितांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढल्यास प्लाझ्मा दात्यांना नक्कीच पुण्य मिळेल.


एकदा का तुम्ही कोरोनामुक्त झालात तर पुढील तीन महिने पंधरा दिवसांच्या फरकाने सहा वेळा प्लाझ्मा दान करता येतो. एकावेळी चारशे मिली प्लाझ्मा घेतला जातो, तो दोन कोरोना बाधितांना दिला जातो. इतकी सोपी ही पद्धत आहे, मात्र अनेक गैरसमजातून प्लाझ्मा दान करणारे पुढे येत नाहीत. म्हणूनच पिंपरी चिंचवड महापालिकेने प्लाझा दान करणाऱ्यांना प्रोत्साहनात्मक दोन हजार रुपये देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. जेणेकरून प्लाझ्मा दान करणारे मोठ्या संख्येने पुढे येतील आणि प्लाझ्मा अभावी कोरोना रुग्णांची सुरू असलेली मृत्यूची झुंज संपेल. पण ते महापालिकेच्या रक्तपेढीतच हे प्लाझ्मा दान करावे लागणार आहे. अशी माहिती सभागृह नेता नामदेव ढाके यांनी दिली आहे. याशिवाय महापालिका रुग्णालयाबाहेर उपचार घेणाऱ्या कोरोना बाधितांकडून 200 मिली प्लाझ्मासाठी सहा हजार रुपये आकारले जायचे. तो ही निर्णय मागे घेत आता सरसकट सर्वांना प्लाझ्मा मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.


प्लाझ्माचा तुटवडा राज्यात सर्वत्रच जाणवतोय. ही उणीव भरून काढण्यासाठी पिंपरी महापालिकेने असा तोडगा काढलाय, असाच निर्णय राज्यपातळीवर झाला तर प्लाझ्माचा तुटवडा आपोआप संपेल आणि मृत्यूंशी झुंज सुरू असलेल्या कोरोना बाधितांना जीवदान मिळेल.