पुणे : पुण्यात येरवडा कारागृहातील कैद्यांनी यावर्षी 35 एकर शेती कसत तब्बल 68 लाखांचं उत्पादन कारागृह शेती विभागाला मिळवून दिलं. महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असताना येरवड्यातील कैद्यांनी नियोजनबद्ध शेती करुन उच्चांकी उत्पादन दिलं.


हातून एखादा गुन्हा घडल्यानंतर आरोपीला तुरुंगातील चार भिंतीत आयुष्य जगावं लागतं. बाहेरील जगाशी त्याचा संबंध तुटतो. मात्र कारागृहात असताना कैद्यांचे वर्तन सुधारावं आणि सुटकेनंतर त्यांचं पुनर्वसन व्हावं, यासाठी विविध योजना राबवल्या जातात. येरवडा कारागृहातील कैद्यांकडून शेतीकामासोबत लॉन्ड्री, हातमाग, शिवणकाम, सुतारकाम, लोहारकाम, चित्रकला यासारखी एकूण 15 ते 16 प्रकारची कामं कारागृह विभागाकडून करुन घेतली जातात.


येरवडा खुल्या कारागृहाकडे 270 एकर शेती क्षेत्र आहे. मात्र यामधील फक्त 35 एकर भागात शेती केली जाते. गेल्या वेळी या भागातील शेतीतून 31 लाख रुपये इतकं उत्पन्न मिळालं होतं. यावर्षी राज्यात अनेक ठिकाणी पाणी कमी आहे. मात्र यावर मात करत येरवडा कारागृहातील कैद्यांनी शेती उत्पन्नात उच्चांक गाठला. यावेळी हे उत्पन्न दुपटीपेक्षा वाढून 68 लाखापर्यंत पोहचलं.



VIDEO | अमरावती | कारागृहातील कैद्यांनीही बाप्पाच्या मूर्ती साकारल्या 





कारागृहातील अनेक कामं कारागृहातच केली जातात. परंतु शेतीसाठी कैद्यांना चार भिंतींच्या बाहेर जावं लागतं. खुल्या कारागृहातील कैद्यांच्या मदतीनं केळी, आंबा यासारखी फळं, पालेभाज्या, कडधान्यं आणि बागायती पिकांचे उत्पादन करुन शेती फुलवली गेली. यातून मिळालेलं उत्पन्न उल्लेखनीय आहे.


खरं तर यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना येरवडा खुल्या करगृहातील कैद्यांनी अधिकाऱ्यांच्या मदतीने पाण्याचं नियोजन करुन शेती केल्यामुळे त्याचं कौतुक केलं जात आहे.