Pune Ganeshotsav 2022: सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात वाहतूक कोंडी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे वाहतूक विभागाने (Pune city) रस्त्यांवर वाहने पार्क करण्यास मनाई केली आहे आणि 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर दरम्यान वापरता येणारी 19 पार्किंग क्षेत्रे निश्चित केली आहेत. त्या व्यतिरिक्त पुणे शहर वाहतूक विभागाने 18 पार्किंग लॉट्स ओळखले आहेत जे विसर्जन दिवशी 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर रोजी वापरता येणार आहे. 5 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जनानंतर लोक त्यांच्या कुटुंबासह गणपती दर्शानासाठी बाहेर पडतात आणि त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहतूक पोलिसांनी पार्किंगची (parking) व्यवस्था केली आहे.


रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी लक्षात घेऊन आम्ही एक वाहतूक आराखडा तयार केला आहे आणि शहरातील 19 पार्किंग क्षेत्रे ओळखली आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी, आम्ही 18 पार्किंग स्पॉट्स निश्चित केले आहेत जेणेकरुन लोकांना त्यांची वाहने संबंधित पार्किंग भागात पार्क करता येतील आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय उत्सवाचा आनंद घेता येईल, असं वाहतूक पोलिस उपायुक्त  राहुल श्रीरामे म्हणाले. भक्तांनी त्यांची वाहने नेमून दिलेल्या पार्किंगच्या ठिकाणी पार्क करून आम्हाला सहकार्य करावे. त्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियम, कायदे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.


 


गरवारे कॉलेज, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, काँग्रेस भवन, मनपा भवन पार्किंग, सीओईपी मैदान, मंगला टॉकीज, हमालवाडा पार्किंग, जयंतराव टिळक पूल ते भिडे पूल, नदीपात्राचा रस्ता, आयएलएस लॉ कॉलेज, संजीवनी हॉस्पिटल, जैन हॉस्टेल, गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस, फर्ग्युसन कॉलेज, आपटे प्रशाला, बीएमसीसी कॉलेज, पुरम चौक ते हॉटेल विश्व रस्त्याच्या डाव्या बाजूस, न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे.


दरवर्षीप्रमाणे पाच मानाचे गणपती मंडळे 9 सप्टेंबर रोजी लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक काढणार असून यंदा मूर्ती विसर्जनासाठी वेळेचे कोणतेही बंधन नाही. जे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत त्यात लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, बागडे रस्ता, बाजीराव रस्ता, गणेश रस्ता, गुरुनानक रस्ता आणि जेएम रस्ता यांचा समावेश आहे. विसर्जन काळात या प्रमुख रस्त्यांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवरही वाहनांच्या पार्किंगला बंदी असेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.


गणपती मिरवणुकीदरम्यान वाहतुकीच्या प्रवाहावर देखरेख आणि नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिस मोक्याच्या ठिकाणी वॉच टॉवर उभारणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव मिरवणुका इतर लोकांपासून वेगळ्या करण्यासाठी महत्त्वाच्या रस्त्यांवर बॅरिकेडिंग करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनांची बिघाड झाल्यास आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी पोलिस क्रेन तैनात असतील.


याशिवाय, स्वतंत्र, तात्पुरती वाहतूक नियमावली आणि वळवण्याची व्यवस्था देखील केली जाईल. शिवाजी रस्त्यावर प्रीमियम गॅरेज चौक ते गोटीराम भैय्या चौक, डेंगळे पूल आणि शिवाजीनगर येथील जुने गोडाऊन ते अण्णाभाऊ साठे चौक दरम्यान कोणतीही वाहने असणार नाहीत. संताजी घोरपडे रस्ता ते शाहीर अमर शेख चौक दरम्यानच्या पर्यायी रस्त्याने जाण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे.