BJP Announce MLC Election Candidate : राज्यातील विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना डावललं अन् त्या ठिकाणी महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली. यानंतर उमा खापरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपने मला उमेदवारी दिल्याचा पंकजा ताईंनाही आनंद होईल, असं उमा खापरे यांनी एबीपी माझाशी साधलेल्या संवादात म्हटलं.
"हे भाजपमध्येच घडू शकत. एका सामान्य कार्यकर्तीला उमेदवारी मिळाली. पंकजा ताई आमच्या नेत्या आहे. त्या शर्यतीत असल्याने मी कोणाकडे ही उमेदवारी मागितली नव्हती. त्यांच्या जागी मला उमेदवारी मिळाली हे मी मानत नाही. कारण त्या त्या आहेत, मी त्यांच्यासमोर छोटी कार्यकर्ती आहे. त्यांना उमेदवारी मिळाली नाही, याचं वाईट वाटतंय. पण त्या स्पर्धेत असल्याने मी उमेदवारी मागितली नव्हती. परंतु अनपेक्षितपणे माझी वर्णी लागली. पण दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे असते तर त्यांनाही आनंद झाला असता, तसाच आनंद पंकजा ताईंनाही झाला असेल, असा विश्वास उमा खापरे यांनी व्यक्त केला.
दरम्यान भाजपने विधानपरिषदेसाठी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा गिरीश खापरे यांना संधी दिली आहे. तर पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावललं आहे. मागील काही काळापासून पंकजा मुंडे यांना डावललं जात असल्याने मुंडे समर्थक नाराज आहेत.
कोण आहेत उमा खापरे?
- पंकजा मुंडे, चित्रा वाघ यांची नाव चर्चेत असताना भाजपकडून उमा खापरे यांची वर्णी लागली आहे.
- उमा खापरे या भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आहेत.
- पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन वेळा नगरसेविका (1997 आणि 2002) होत्या.
- त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत एकदा विरोधी पक्ष नेत्या म्हणूनही काम पाहिलं आहे.
- त्यांनी भाजप पुणे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहिलं.
- महिला मोर्चा पदाधिकारी, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्षा ते महिला प्रदेशाध्यक्षा असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.
- तीस वर्षांपासून भाजपच्या कट्टर समर्थक आहेत. महिला ओबीसी चेहरा म्हणून संधी दिल्याची चर्चा आहे.
भाजपच्या उमेदवार यादीची वैशिष्ट्ये
- संघटनेत काम करणाऱ्या दोन उमेदवारांना उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना संधी देऊन भाजपने कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे.
- तसेच यावेळी भाजपने घटक पक्षाला उमेदवारी दिली नाही.
- पंकजा मुंडे की चित्रा वाघ या चर्चेत महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना लॉटरी लागली
- राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांना उमेदवारी देणं टाळलं त्यामुळे आता पंकजा मुंडे यांना कुठली संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
- पराभूत झालेल्या राम शिंदे यांचं पुनर्वसन करण्यात आलं, ओबीसी चेहरा म्हणून संधी
- देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी
विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक
राज्यात विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक होणार आहे. 2 जूनला अधिसूचना जाहीर झाली आहे. त्यानंतर 9 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस रंगणार आहे.