Punjabi singer Sidhu Moosewala: आपल्या मुलाने कोणाची हत्या करावी किंवा वाईट वळणाला लागावं असं कोणत्याच आईला वाटत नाही. उलट त्याने आपलं नाव मोठं करावं. देशासाठी काहीतरी करावं, असंच प्रत्येक पालकाला वाटत असतं, असं सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या संतोष जाधवची आई सांगत होती. सिता जाधव असं आरोपी असलेल्या संतोषच्या आईचं नाव आहे. त्याची आई खासगी दवाखान्यात मदतनीस म्हणून काम करते.
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात 8 लोकांची छायाचित्रं समोर आली होती. त्यातलाच संतोश जाधव हा आरोपी पकडण्यात आला. संतोषचं मुळ गाव पुण्यापासून काही अंतर असलेलं मंचर आहे.
मला दोन मुले आहेत. मोठा संतोष आणि लहान मुलगी आहे. गेले दीडवर्ष झाले संतोष आणि माझी भेट झाली नाही आहे. त्यानंतर संतोष माझ्यासमोर आरोपी म्हणूनच आला. 10 वर्षांपुर्वी त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर संतोषच्या वागण्यात बदल झाला होता. सतत मारामारी, भांडणं यातच असायचा. मी अनेकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की हे मारामारी वगैरे गैर आहे. मात्र वडिलांचं छत्र नसल्याने त्याला घरात कोणाचा धाक नव्हता. त्यामुळे त्याला आवरणं कठिण झालं होतं, असं त्याची आई सांगते.
मित्राची वाईट संगत
अनेक वर्षांपासून त्याला अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले मित्र होते. मात्र त्यातल्या वाईट मित्रांच्या संगतीत संतोष लागला. लहानपणापासून तो फार घरी नसायचा. त्याला त्याचे मित्र प्रिय वाटायचे. घरात लहाण बहिण आहे, याचंही भान त्याला कधीच नव्हतं. त्यामुळे काहीही करायचं असेल तर आम्ही दोघीच करत होतो. वडिल गेल्यापासून त्याने त्याचं वेगळं जग निर्माण केलं होतं. त्या जगात आई-बहिणीसाठी जागा नव्हतीच आणि विचारही नव्हता. आईजवळ सगळेच गुन्हे माफ आहे, असं त्याला वाटत असेल. संतोषला आपल्या वयाच्या लोकांची संगत नव्हती. त्याचे सगळे मित्र त्याच्यापेक्षा वयाने मोठे होते आणि पैशानेही मोठे होते. पैशाचं वेड माणसाला वेडं करतं. त्याच्या मित्रांच्या संगतीनेच तो वाईट मार्गाला लागला, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
गेले अनेक दिवस फरार होता
गेल्या 1 ऑगस्टला संतोषने ओंकार उर्फ राण्या बाणखेलेची हत्या केली होती. या हत्येनंतर संतोष त्याच्या साधीदारासह फरार झाला होता. याच प्रकरणासाठी गेले अनेक दिवस मंचर पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र तेव्हापासून तो फरार होता. त्याच्यावर मोक्कासुद्धा लावण्यात आला होता. त्याच्या आतापर्यंत अनेक चोऱ्या, मारामारी यासंदर्भातील गुन्हे दाखल आहे. मात्र आता त्याचं नाव सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात देखील समोर आलं आहे.