BJP Announce MLC Election Candidate : राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपने प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा गिरीश खापरे यांना संधी दिली आहे. तर, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलले आहे. मागील काही काळापासून पंकजा मुंडे यांना डावलले जात असल्याने मुंडे समर्थक नाराज आहेत.
उमा खापरे यांना महिला ओबीसी चेहरा म्हणून संधी दिल्याची चर्चा
पंकजा मुंडे, चित्रा वाघ यांची नाव चर्चेत असताना भाजपकडून उमा खापरे यांची वर्णी लागली आहे. उमा खापरे या भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन वेळा नगरसेविका (1997 आणि 2002) होत्या. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत एकदा विरोधी पक्ष नेत्या म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यांनी भाजप पुणे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहिलं. महिला मोर्चा पदाधिकारी, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्षा ते महिला प्रदेशाध्यक्षा असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. तीस वर्षांपासून भाजपच्या कट्टर समर्थक आहेत. महिला ओबीसी चेहरा म्हणून संधी दिल्याची चर्चा आहे.
भाजपच्या उमेदवार यादीची वैशिष्ट्ये
संघटनेत काम करणाऱ्या दोन उमेदवारांना उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना संधी देऊन भाजपने कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे.
तसेच यावेळी भाजपने घटक पक्षाला उमेदवारी दिली नाही.
पंकजा मुंडे की चित्रा वाघ या चर्चेत महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना लॉटरी लागली
राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांना उमेदवारी देणं टाळलं त्यामुळे आता पंकजा मुंडे यांना कुठली संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
पराभूत झालेल्या राम शिंदे यांचं पुनर्वसन करण्यात आलं, ओबीसी चेहरा म्हणून संधी
देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक
राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक होणार आहे. 2 जूनला अधिसूचना जाहीर झाली आहे. त्यानंतर 9 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस रंगणार आहे.