पुणे: पुण्यातील कात्रज येथील महापालिकेच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील एका घुबडाची चोरी  शनिवारी रात्री झाल्याची घटना उघडकीस आल्याने देशातील मॉडेल झू असा लौकीक असणाऱ्या या प्राणिसंग्रहालयातील वन्यजीव व पक्षांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.


 

जादूटोणा, करणी, पैशाचा पाउस पाडणे आदी अंधश्रध्दा जोपासणार्यांमुळे घुबडाला मोठी मोगणी आहे आणि त्याला मागेल ती किंमत मिळत आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

प्राणिसंग्रहालयात सकाळी नियमीत होणारी पाहणी व प्राणी पक्षी गणणा करण्यासाठी सुरक्षा जमादार शामराव कांबळे  घुबड विभागात गेले. गव्हाणी जातीच घुबडांच्या पिंजर्यात त्यांना दोन घुबड होते. त्याच शेजारी असलेल्या शृंगी प्रजातीच्या पिंजर्यातील दोन घुबडांपैकी एक घुबड त्यांना आढळले नाही. कांबळे यांनी तत्काळ प्राणिसंग्रहालयाच्या वरिष्ठाना हा प्रकार सांगितला सुरक्षा पथकाने पिंजऱ्यात जाऊन पाहणी केली असता, त्यांना जाळी तुटल्याचे निदर्शनास आले. मध्यरात्रीनंतर जाळी तोडून घुबडाची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

 

रात्री प्राणिसंग्रहालयाची सुरक्षा सांभाळण्यासाठी महापालिकेचे पाच व ठेकेदारांचे नऊ सुरक्षा रक्षक कार्यरत असताना ही चोरी झाल्यामुळे प्राणिसंग्रहालयाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घुबड चोरीला जाणे हि घटना धक्कादायक आहे.