पुणे : नागराज मंजुळे दिग्दर्शित 'फँड्री' चित्रपटात भूमिका केलेल्या एका कलाकाराला घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. योगेश चौधरी असं आरोपीचं नाव असून त्यांनी फँड्रीशिवाय अनेक शॉर्टफिल्ममध्येही काम केलं आहे.
पुणे पोलिसांनी योगेशसोबत त्याच्या 4 साथीरादांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 615 ग्रॅमचं सोने (यात अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाचे दागिने) 10 तोळे वजनाची सोन्याची लगड, त्याचप्रमाणे 496 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू (यात 13 नाणी) 13 चमचे, लक्ष्मीची मूर्ती, कॅमेरा, दोन मनगटी घड्याळे, सोने वितळवण्यासाठी वापरलेली मशीन पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
क्वॉर्टर गेट सोसायटीमधील एका वकिलाच्या घरातील चोरीचा तपास सुरु होता. काही तरुण पिंपरीत सोन्याचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी 5 जणांना बेड्या ठोकल्या.
योगेशने फँड्री चित्रपटातत शाळेतल्या एका विद्यार्थ्याची छोटीशी भूमिका केली होती. विशेष म्हणजे जब्याच्या भूमिकेसाठी आपली ऑडिशन झाल्याचंही तो म्हणतो. याशिवाय तंबाखु विरोधी प्रतिज्ञा आणि प्रिझम या लघुपटातही त्याने काम केलं आहे. अर्धवट राहिलेलं शिक्षण आणि वाईट संगत, पैशाच्या हावेतून तो गुन्ह्यात अडकल्याचं त्याने सांगितलं.