पुणे: पिंपरी चिंचवडमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. त्या कार्यक्रमात गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.


पिंपरीमध्ये क्रांतीवीर चाफेकर राष्ट्रीय संग्राहलायच्या इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्याठिकाणी गोंधळ होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मराठा आरक्षणासाठी ठिय्या

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चेकऱ्यांनी मराठवाड्यात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन दिलं. बीड जिल्ह्यातील परळीत 18 जुलैपासून या ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर जागेवरुन हलणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महापूजा करु देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने त्यावेळी दिला होता.

परळीनंतर हे ठिय्या आंदोलन औरंगाबाद, लातूर, नांदेड, सोलापूर असं राज्यभरातील विवध जिल्ह्यात सुरु झालं.

मेगा भरती रद्द करा

जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोवर मेगा भरती रद्द करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसांपासून परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन सुरुच आहे. जोवर ठोस मागणी मान्य होत नाही तोवर इथला ठिय्या मागे घेणार नाही. अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे.