पुणे : भरधाव कार पुलाचा कठडा तोडून पाण्यात कोसळल्याने झालेल्या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हडपसर येथील सोनार पुलावर हा अपघात झाला. नितीन कुंभार असं मृत व्यक्तीचे नाव आहे. नितीन कराटे प्रशिक्षक असून लोणी काळभोर परिसरातील एका शाळेत कराटेचे प्रशिक्षण देत होते.
नितीन कुंभार हे पहाटेच्या सुमारास सासवडच्या दिशेने जात होते. गाडी चालवत असताना अचानक डोळा लागल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. त्यांची सॅन्ट्रो कार पुलाचा कठडा तोडून थेट पाण्यात कोसळली. त्यानंतर कारमधून बाहेर पडता न आल्यामुळे नितीन यांचा गुदमरून मृत्यू झाला.
स्थानिक नागरिकांनी अपघाताची माहिती अग्निशमन दलाला दिली. परंतु अग्निशमन दलाचे जवान येइपर्यंत नागरिकांनी क्रेनच्या सहाय्याने कार आणि मृतदेह बाहेर काढले होते. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.