ब्रेकअपनंतरही बोलावं म्हणून पुण्यात मैत्रिणीच्या घरासमोर स्फोट घडवला!
एबीपी माझा वेब टीम | 11 Aug 2018 08:23 PM (IST)
ब्रेकअप झाल्यानंतरही मैत्रिणीने आपल्याशी बोलावं यासाठी एका तरुणाने स्टंटबाजीची हद्द केली. मैत्रिणीच्या सोसायटीमध्ये त्याने चक्क स्फोट घडवून आणला.
पुणे : माणूस प्रेमात पडलं की ते प्रेम मिळावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपल्याला हवं असणारं प्रेम मिळावं म्हणून आटापिटा केला जातो. ते सगळे क्षण गुलाबी असतात. मात्र मिळालेलं प्रेम सोडून गेलं की जीवाची घालमेल होते. झोप उडते. पाहिलेल्या स्वप्नांची झालेली राख बघवत नाही. व्याकूळपणे प्रत्येक दिवस ढकलला जातो. पण जेव्हा हीच व्याकूळता अघोरी बनते तेव्हा काय होतं? पुण्यात अशीच प्रेमाच्या गुलाबी रंगाला काळी किनार देणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील धायरी भागातील अलोक पार्क सोसायटी आठ ऑगस्टला पहाटे तीन वाजता हादरली. स्फोटाच्या आवाजाने रहिवासी जागे झाले आणि नेमकं काय झालंय हे पाहण्यासाठी खाली आले. तर त्यांना धक्का बसला. या स्फोटाने रहिवाशांची झोप उडवली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावलं. स्फोटाच्या मागच्या कारणांची शहानिशा जेव्हा त्यांनी केली, तेव्हा धक्कादायक गोष्टी समोर आल्या. ब्रेकअप झालेल्या आपल्या मैत्रिणीने आपल्याशी परत बोलावं म्हणून किशोर मोडक या 20 वर्षीय तरुणाने हा स्फोट घडवून आणला, असं पोलिसांच्या तपासात समोर आलं. या मुलीशी त्याची ओळख झाली होती आणि एक वर्षापूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर तिचं लक्ष परत आकर्षून घेण्यासाठी त्याने हा घाट घातल्याचं समोर आलं. लाल a star या गाडीतून ते आले आणि रात्री तिथे ही स्फोटकं ठेवली. सुतळी बॉम्बची भारुद आगपेटीत भरून त्याला एमसीलने गुंडाळले. त्याला बेअरिंगही त्याने लावली. त्यानंतर त्याची वात पेटवली. या स्फोटाने अलोक पार्कच्या पहिल्या मजल्यावरच्या एका घराची काच फुटली. यानंतर पोलिसांनी किशोर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.