पिंपरी-चिंचवड : महाविद्यालयातील कार्यक्रमाच्या वादातून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरा तरुण गंभीर जखमी आहे. चाकणच्या खराबवाडीत शुक्रवारी रात्री ही घटना घडली.


प्रशांत बिरदवडे मृत तरुणाचं नाव आहेत तर पियुष धाडगे जखमी तरुणाचे नाव आहे. जखमी पियुष धाडगे आणि अक्षय शिंदे या दोघांमध्ये गेल्या वर्षभरापासून वाद सुरु होता. अगदी एकमेकांकडे पाहण्याचं निमित्तही त्यांना भांडणासाठी पुरेसं होतं.


अक्षयला कुठून तरी खबर लागली होती की पियुष त्याचा खून करणार आहे. तत्पूर्वी आपणच त्याचा काटा काढायचा असं त्याने मित्रांसोबत कट रचला. मग पियुषला फोन करुन वाद मिटवण्यासाठी भेटायला बोलावलं. प्रशांत बिरदवडेसोबत पियुष अक्षयला भेटायला गेला होता.


मात्र अक्षय सात ते आठ मित्रांसोबत पियुषला संपवायचं या उद्देशाने पोहोचला. चर्चा सुरु होताच अक्षय आणि त्याच्या साथीदारांनी पियुषवर कोयता, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने प्रहार करायला सुरुवात केली. पियुषने जखमी अवस्थेतच तिथून पळ काढला. पण खवळलेल्या टोळी तावडीत प्रशांत सापडला.


पियुष आणि अक्षय यांच्या भांडणात प्रशांतचा नाहक बळी गेला. पियुष हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून हल्लेखोरांपैकी अनेकांवर दंगलीचे गुन्हे दाखल आहेत. प्रशांतवर मात्र कोणताच गुन्हा दाखल नव्हता. केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मित्रांसोबत राहणं त्याच्या जीवावर बेतलं. घटनेनंतर हल्लेखोर फरार असून चाकण पोलीस त्यांचा शोध घेत आहे.