पुणे : मागील वेळेस राज्यसभेत गेलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेच्या मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत. माढा लोकसभेतून लढण्याबाबत विचार करू  असे म्हणत शरद पवार यांनी पुन्हा लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटलांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.


पुण्यात बोलताना  शरद पवार यांनी सांगितले आहे की, माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी विजयसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे. मात्र माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही. पण या बाबत विचार करून सांगू असे त्यांना सांगितले, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपल्या इच्छुकांची चाचपणी सुरु केली आहे. राज्यातील ज्या लोकसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त आहे, त्या मतदारसंघांबाबत पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक सुरु आहे.



यात माढा, जळगाव, शिरुर, उस्मानाबाद, नवी मुंबई, कोल्हापूर या मतदारसंघांचा आढावा घेण्यात येत आहे. माढा लोकसभेसाठी पक्षाची उमेदवारी कुणाला मिळणार याचं चित्र आजच्या बैठकीत स्पष्ट होण्याची शक्यता होती. माढ्यातून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील की माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी द्यायची यावर खल सुरु होता. यात आता शरद पवारांनी नवा ट्विस्ट निर्माण केला आहे.

आज खासकरून माढा , जळगाव, शिरूर, उस्मानाबाद, नवी मुंबई, कोल्हापूर लोकसभा मतदार संघाबाबत चर्चा झाली.  या बैठकीला शरद पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित आहेत. दरम्यान, माढा लोकसभेसह आघाडीमध्ये पक्षाकडे असणाऱ्या जागांवरील उमेदवारांच्या नावावर या बैठकीत चर्चा केली असल्याची माहिती आहे.