पुणे : कोरोनाच्या महामारीत अनेक जण घरातून काम करत आहेत. त्यामुळे घरांमध्ये किरकोळ कारणावरून झालेले वाद विकोपाला जात असून कौटुंबिक कलहाची झळ आता पुरुषांनाही बसत आहे. पुणे पोलिसांच्या 'भरोसा सेल'कडे दाखल झालेल्या तक्रार अर्जातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. 


 पत्नीकडून पतीला मारहाण, मानसिक आणि शारीरिक छळाचे प्रकार वाढत असून केवळ पुण्यात गेल्या दीड वर्षात एक हजार 535 पुरुषांनी पोलिसात तक्रारी केल्या आहेत. पुणे पोलिसांच्या ‘भरोसा कक्षा’कडे दाखल झालेल्या तक्रार अर्जातून ही बाब समोर आली. कोरोनाकाळापासून कौटुंबिक कलहातून एकूण तीन हजार तक्रारी दाखल झाल्या. त्यात महिलांच्या आपल्या पतीविरोधातील तक्रारींची संख्या एक हजार 540  इतकी आहे. म्हणजेच पुरुषांनाही महिलांइतकेच छळाला सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले.


 या तक्रार अर्जांपैकी दोन हजार 394 अर्ज निकाली काढण्यात आले. तसेच दाम्पत्यातील वाद सामोपचाराने मिटवण्यात आले आहेत. कोरोनाच्या संसर्गात दाम्पत्यांमधील वाद वाढीस लागले आहेत. पुणे पोलिसांच्या भरोसा कक्षाकडून समुपदेशन करण्यात येते. तसेच एखाद्या प्रकरणात पोलीस ठाण्यांचीही मदत घेण्यात येत आहे.


  गेल्या वर्षी पुणे पोलिसांच्या भरोसा कक्षाकडे एक हजार 283 पुरुषांनी कौटुंबिक कलहाच्या तक्रारी दिल्या होत्या. महिलांकडून 791 तक्रार अर्ज दाखल करण्यात आले होते. यंदाच्या वर्षी मे अखेरीपर्यंत 252 पुरुषांनी तसेच 749  महिलांनी तक्रार अर्ज दाखल केले आहेत.