Eknath Shinde Pune: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे येत्या 1 ऑगस्टला पुणे (Pune) दौऱ्यावर असणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच पुणे दौरा असणार आहे. आतापर्यंत अनेक पदाधिकाऱी शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे पुण्यातील शिवसेना (ShivSena) खिळखिळी होण्याच्या मार्गावर आहे. एकनाथ शिंदे यांच्या पुणे दौऱ्यामुळे समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मात्र शिवसेनेला धक्का बसण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही आहे.

या दौऱ्यात ते फुटबॉल मैदानाचे उद्‌घाटन करणार आहेत. तसंच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरतीही करणार आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक नेते पुणे दौऱ्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतात. सत्तेसाठी साकडं घालतात. त्यामुळे एकनाथ शिंदे नेमकं काय साकडं घालणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यापुर्वी शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे त्याच्या वाढदिवसानिमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याआधी त्या आरती करणार असल्याने पुण्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चेला उधाण आलं आहे. 

मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) हे नुकतेच एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. त्यानंतर मावळात शिवसेनेच्या पडझडीस आता सुरवात झाली आहे. त्यांच्यासोबत आता नेमकं कोण कोण शिंदे गटात सामील होणार?, याची शिंदे गटाला उत्सुकता आहे.

पुणे जिल्हातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत. या पदाधिकाऱ्यांना शिंदे गटाकडून नवे पद देण्यात आले आहेत. किरण साळी, विजय शिवतारेरमेश कोंडे, अजय भोसले, नाना भानगिरे या पदाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या पदावर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. रमेश कोंडे यांची पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख पदी, नाना भानगिरे यांची शहरप्रमुखपदी, अजय भोसले यांची जिल्हा व शहर सह-संपर्कप्रमुखपदी तर किरण साळी यांची युवासेना सचिवपदी नियुक्ती केली आहे. युवासेनेचे राज्य सचिव वरूण सरदेसाई यांची युवासेनेतून हकालपट्टी केल्याने ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या जागी आता किरण साळी यांची युवासेना राज्य सचिव पदी निवड करण्यात आली आहे.