Pune NCP Protest For MPSC Student: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC Exam) परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रम दोन वर्षांनंतर लागू करून सध्याची परीक्षा जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणेच घेण्यात यावी, या मागणीकरता पुण्यात (Pune Protest) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून (NCP) निदर्शने करण्यात आली. अचानक लागू केलेल्या या नियमामुळे अनेक विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. तसंच या निर्णया विरोधात कोणत्याही विध्यार्थ्यांने आंदोलन करू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. ही बाब लोकशाहीला काळीमा फासणारी व  विध्यार्थ्यांचे मूलभूत अधिकार विरोधी आहे, असं मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्ता नवीपेठेत ही निदर्शनं करण्यात आली.



आयोगाचा नवीन अभ्यासक्रमाचा निर्णय स्वागतार्ह आहे मात्र विध्यार्थ्यांनाही नवीन अभासक्रमानुसार परीक्षेच्या तयारी करण्यासाठी वेळ देणे ही गरजेचं आहे. सध्या होणाऱ्या परीक्षा या आता असणाऱ्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात याव्या. राज्यसरकारला स्थापन होऊन महिना होत आला तरी अद्यापही महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या समस्या मांडण्यासाठी मंत्री मंडळ स्थापन करण्यासाठी  वेळ लागत आहे तर विध्यार्थ्यांनाही नवीन अभ्यासक्रम प्रमाणे परीक्षा देण्यासाठी आयोगाने कालावधी देणे आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम दोन वर्षांनी लागू करावा, असं मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.



चुकीच्या नियम विरोधात आंदोलन करण्याता अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय लोकशाहीला दिलेल्या संविधानात लोकशाही मार्गाने जर कामकाग सुरु नसेल तर त्यावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र सरकार विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यापासून थांबवत आहेत. सरकारची ही हिटलरशाही खपवून घेणार नाही. लोकशाहीचा अवमान होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच विद्यार्थ्यांसाठी  रस्त्यावर उतरून लढण्यासाठी तयार आहे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत राहील, असंही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणाले. नवीन अभ्यासक्रम दोन वर्षांनी लागू करण्यात यावा. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही शिवाय त्यांना अभ्यासासाठी वेळ मिळेल. त्यामुळे आम्ही ही मागणी करत असल्याचं त्यांनी सांगितलं.