Omicron variant case in Maharashtra :  महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा (Omicron) पहिला बाधित आढळल्यानंतर प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजनांवर भर दिला जात आहे. आफ्रिकन देशातून आलेल्या डोंबिवलीतील एका व्यक्तीला ओमायक्रॉनच्या संसर्गाची बाधा झाल्याचे समोर आले. तर, दुसरीकडे पुण्यातील 60 वर्षीय संशियत बाधितामध्ये ओमायक्रॉन नव्हे तर इतर व्हेरियंटची लागण झाल्याचे समोर आले आहे. 


आफ्रिकन देश झांबियातून पुण्यात आलेल्या 60 वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताच्या जीनोम सिक्वेसिंगचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून आरोग्य विभागाला देण्यात आला. या रुग्णामध्ये डेल्टा सबलिनिएज हा विषाणू आढळून आला आहे. या कोरोनाबाधिताला ओमायक्रॉनची लागण नसल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे. पुण्यात मागील वर्षी दुबईतून आलेल्या एका दाम्पत्याला कोविडची लागण झाली होती. हे राज्यातील पहिलेच प्रकरण होते. 


मुंबई विमानतळावरील तपासणीत १ डिसेंबरपासून आतापर्यंत ८ प्रवासी कोविड बाधित आढळले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या शिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील स्थानिक पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. चार डिसेंबर रोजी सकाळपर्यंत मुंबई विमानतळावर हाय रिस्क देशातून आलेल्या 3839 प्रवाशांची आर.टी.पी.सी.आर तपासणी करण्यात आली. तर इतर देशांमधून आलेल्या 344 प्रवाशांचीही आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.


आरोग्य विभागाचे आवाहन 


विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड प्रोटोकॉल नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.  नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे, त्याशिवाय मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आले आहेत त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास माहिती द्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: