Pune Sasoon Hospital : सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या (Old Pension Scheme) संपाचा आज तिसरा दिवस आहे. या संपाचा आता परिणाम सामान्य नागरिकांनाही व्हायला लागला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस या संपावर गेल्यामुळे याठिकाणी येत असलेल्या रुग्णांना याचा काही प्रमाणात फटका बसतो. या संपामुळे नागरिकांवर किंवा रुग्णांच्या (Sasson Hospital) उपचारावर परिणाम होऊ नये यासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने नर्सेस नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. 


एका महिन्यासाठी नर्सेसच्या भरतीला सुरुवात


पुण्यातील ससून रुग्णालयात हजारो रुग्ण येऊन उपचार घेत असतात मात्र या संपामुळे नागरिकांना काहीसा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यासाठीच पुण्यातील ससून रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने नर्सेस (परिचारक) नियुक्त करायला सुरुवात झाली आहे. सरकारी अधिकारी, कर्मचारी जुनी पेन्शन लागू करा, या मागणीसाठी संपावर आहेत. याचा फटका पुण्यातील ससून रुग्णालयातील रुग्णांना होऊ नये यासाठी 1 महिन्याच्या कालावधीसाठी नर्सेसच्या भरतीला सुरुवात केली आहे, अशी माहिती अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी दिली आहे. 


ससून रुग्णालयातर्फे 100 नर्सेस तसेच वर्ग 4 श्रेणीचे कर्मचारी भरतीसाठी काल जाहिरात दिली होती. या पार्श्वभूमीवर आज ससून रुग्णालयात 35 नर्सेस रुजू झाल्या आहेत. संपावर गेलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी परत कामावर यावे यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. तसेच रुग्णांना सेवेचा आभाव कुठे ही जाणवू नये यासाठी मेडिकल कॉलेज, इतर वैद्यकीय संस्थांनी ससून रुग्णालयात भरती प्रक्रियेत यावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.


900 नर्सेस, कर्मचारी कमी आहेत. त्यांना आवाहन करुन झालं आहे. त्यामुळे जाहिरात काढून 100 नर्सेस आणि कर्मचाऱ्यांची 1 महिन्यासाठी प्रोसेस सुरु केली असून 35 कामावर रुजू झाले. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना देखील आवाहन करण्यात आलं आहे. त्यानुसार ते देखील येण्याची शक्यता आहे.


कामावर परिणाम होणार नाही...


मागील दोन दिवसांपासून कर्मचारी आणि नर्सेस संपावर आहेत. रुग्णालयात अनेक रुग्ण असताना या नर्सेस संपावर गेल्याने बाकी यंत्रणेवर ताण आला आहे. 900 कर्मचारी नाही आहेत. त्यामुळे रुग्णालयाची यंत्रणा कोलमडली. मात्र आम्ही पुन्हा नव्या नर्सेस रुजू करत आहोत. त्यांच्या मदतीने यंत्रणा कामाला लागणार आहे. कोणत्याही रुग्णाला आणि त्यांच्या नातेवाईकांना याचा त्रास होणार नाही, याची आम्ही खबरदारी घेणार असल्याचंही रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर म्हणाले. मात्र अजूनही अनेक नातेवाईकांची रुग्णालयासमोर गर्दी दिसत आहे.