पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीन कार्यकर्त्यांवर पुण्यात पत्रकाराच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहसीन शेख, महादेव बालगुडे, सचिन कुंभार अशी या तिघांची नावं आहेत. पत्रकार कृष्णा वर्पे यांनी यासंदर्भात पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा वर्पे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 'मोहसीन शेख याने काही दिवसांपूर्वी वर्पे यांना फोन करुन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि ऑफिसचा पत्ता विचारुन धमकावलं होतं. तर महादेव बालगुडे आणि सचिन कुंभार याने या पत्रकाराच्या पत्नीविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केलं'.

गेल्या काही दिवसांपासून कृष्णा वर्पे यांना राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांकडून त्रास दिला जात होता. सुरुवातीला वर्पेंनी याकडे दुर्लक्ष केलं. परंतू त्यांच्या पत्नीबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्यामुळे त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मोहसीन शेखचा 'राष्ट्रवादीचे शिलेदार' म्हणून गौरव केला होता. 'राष्ट्रवादीच्या या शिलेदाराचा आम्हाला अभिमान आहे', अशी पोस्ट त्यांच्याकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती.