Amruta Fadanvis Post Comment:  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा गावातील तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. अमित सुदाम वायकर (रा. कावळेमळा, चाळकवाडी-पिंपळवंडी, ता. जुन्नर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. 


जुन्नर तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्या आशा बुचके यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अश्लिल आणि खालच्या पातळीची भाषा वापरली असा आरोप या तक्रारीत केला होता. अर्वाच्च भाषा वापरत कमेंट सोशल मीडियावर पोस्ट केली होती. पक्षाच्या नसल्या किंवा अमृता फडणवीस जरी असल्या तरी देखील महिलेबाबत अशा भाषेत कमेंट करणे योग्य नाही. त्या आमच्या नेत्यांच्या पत्नी आहेत. त्यांच्याबाबत अशी कमेंट करुन आमच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला होता. 


काय होती पोस्ट?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे येथील सभेत खरी शिवसेना आमच्या सोबतच असल्याचे म्हटले होते. त्याबाबतचे वृत्त प्रसारित झाले होते. त्यावर अमित वायकर याने कमेंट केली होती. ही कमेंट फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना उद्देशून केली होती. ती कमेंट करणं तरुणाच्या चांगलंच अंगलट आलं आहे.


विधानामुळे कायम चर्चेत
अमृता फडणवीस त्यांच्या पोस्टमुळे किंवा विधानांमुळे कायम चर्चेत असतातच मात्र त्यांच्या गाण्यामुळे त्या जास्त चर्चेत असतात. त्यांनी नव्या गाण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या गाण्याची अनेकजण वाट बघत असतात. मात्र त्यांना या दोन्हीमुळे कायम ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. अनेकदा ट्रोलर्स वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करतात. त्यात अनेक अर्वाच्च भाषेत केलेल्या कमेंट असतात. त्या या सगळ्या कमेंट्स मोठं आव्हान म्हणून स्वीकारतात मात्र त्यांच्यावर केलेल्या या कमेंट्समुळे आता तक्रारी दाखल होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कमेंट्स करताना विचार करावा आणि सतर्कता बाळगावी असं तरुणांना आवाहन करण्यात आलं आहे.