Gaja Marne: पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला विशेष मोक्का न्यायालयाने जामीन मंजूर करताच पुणे शहरात पुन्हा एकदा या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कोथरूडमध्ये शिवजयंती दिनी अभियंता देवेंद्र जोग यांना मारहाण केल्याप्रकरणी मारणे आणि त्याच्या टोळीवर मोक्का लावण्यात आला होता. पुणे पोलिसांनी त्याला टोळी प्रमुख म्हणून अटक केली होती आणि न्यायालयात हजर केल्यावर शिक्षा देखील सुनावली होती. मात्र फिर्यादी देवेंद्र जोग यांनी न्यायालयात हजर राहून कुणीही चिथावणी दिली नसल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. विशेष न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जात-मूचलक्यावर जामीन मंजूर केला.
गजा मारणेला पुणे शहरात थांबण्यास मनाई
जेलमधून जामिनावर सुटका होताच गजानन मारणे थेट पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल झाला आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त यांच्या समोर हजेरी लावली. पोलिसांनी मात्र त्याला पुणे शहरात थांबण्यास मनाई केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर गजानन मारणेचा वकिल विजयसिंह ठोंबरे यांनी मोक्का लावताना लागणारे कायदेशीर निकष पोलिसांनी पाळलेच नसल्याचा आरोप त्यांनी केला. “हे प्रकरण पूर्णपणे बनावट आहे. रस्त्यावर भांडण झाले, पण आम्ही कुठेही काही सांगितले नव्हते. तपासात आम्ही पूर्ण सहकार्य केले, ते कधीही फरार नव्हते आणि स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर राहिले,” असे ठोंबरे यांनी स्पष्ट केले.
कोण आहे गजा मारणे?
पुण्यातील गुन्हेगारीच्या जगतात ‘गजा मारणे’ हे नाव वेगळ्या धाकाने उच्चारले जाते. अमोल बधे आणि पप्पू गावडे या दोघांच्या खुनाप्रकरणी त्याला अटक झाली आणि त्यानंतर तब्बल तीन वर्षे तो येरवडा कारागृहात होता. या खटल्यांनंतर त्याची प्रतिमा ‘मारणे टोळीचा म्होरक्या’ म्हणून अधिक बळकट झाली. त्याच्यावर सहापेक्षा जास्त खुनाचे गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी पुण्यातील एका व्यावसायिकाकडून तब्बल २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणीही कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता. जामीनानंतर काढलेली त्याची रॅली शहरभर चर्चेचा विषय ठरली होती. पुणे पोलिसांनी एकदा त्याची ‘धिंड’ काढत त्याला गुडघ्यावर बसवले होते. उद्देश होता की त्याच्या दहशतीला चाप बसावा. पण काही काळानंतर याच गजा मारणे सोबत काही पोलिसांनी पार्टी केल्याचा प्रकार समोर आला आणि पाच पोलिस निलंबित झाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या