Jayant Narlikar: जेष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं आज(मंगळवारी,ता,20) पुण्यातील राहत्या घरी निधन झालं आहे. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला‌. आंतररष्ट्रीय स्तरावर त्यांची मोठी ख्याती होती. त्याचबरोबर डॉ जयंत नारळीकर रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहण्यासाठी देखील लोकप्रिय होते. केंब्रिज या विद्यापीठातून शिक्षण घेतल्यावर ते भारतात परतले. आधी टाटा मुलभूत संशोधन संस्थेत त्यांनी काम केले. त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा उचलला. 2021 मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते‌. आज पहाटेच्या सुमारास झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

Continues below advertisement


जयंत नारळीकर यांनी अगदी सोप्या आणि साध्या भाषेत विज्ञान समजावून सांगणारी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या आकाशाशी जडले नाते या पुस्तकाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले. नारळीकर यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर जयंत नारळीकर यांना अनेक पुरस्कार आणि मानाचे गौरव मिळाले आहेत. 


जयंत नारळीकर यांना मिळालेले पुरस्कार आणि मानाची पदं


- जयंत नारळीकर यांना 1965 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
- जयंत नारळीकर यांना 2004 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
- जयंत नारळीकर यांना 2010 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
- नारळीकरांना भटनागर पुरस्कार आणि एम.पी. बिर्ला हे पुरस्कार देखील मिळाले आहेत.
- त्यांना 2014 साली मिळालेला तेनाली-हैदराबाद येथील नायुद‍अम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुद‍अम्मा स्मृती पुरस्कार-2013
- जयंत नारळीकर यांच्या ‘चार नगरांतले माझे विश्व’या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा 2014 सालचा पुरस्कार मिळाला आहे.
- ’यक्षांची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
- अमेरिकेतील फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (2012)
- फाय फाऊंडेशन, इचलकरंजी यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रभूषण पुरस्कार
- नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (सन 2021)


डॉ. नारळीकर यांचा परिचय


डॉ. नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे 19 जुलै 1938 रोजी झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणिततज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते तर आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. शालेय शिक्षण वाराणसी येथे झाल्यानंतर विज्ञान शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज गाठल्यानंतर त्यांनी बीए, एमए आणि पीएचडी पदवी मिळवली. याशिवाय रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे त्यांनी पटकावली.


डॉ. जयंत नारळीकर यांची साहित्य संपदा


अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस.


इतर विज्ञानविषयक पुस्तके


अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमतीजमती, नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर), नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञानाचे रचयिते, सूर्याचा प्रकोप, चार नगरांतले माझे विश्व (आत्मचरित्र).