पिंपरी चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साद घातलेल्या जनता कर्फ्यू पिंपरी चिंचवडमध्ये ऐतिहासिक नोंद झाली आहे. शहरात काल म्हणजेच रविवारी (२२ मार्च) कोरोनाच्या नियमाचा भंग वगळता एकही गुन्हा नोंद झालेला नाही. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात गुन्हा दाखल न होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची स्थापना 15 ऑगस्ट 2018 साली झाली. तेव्हापासून चोरीचे वेगवेगळे फंडे, फिल्मी स्टाईल दरोडे, पोलिसांना बुचकळ्यात पाडणाऱ्या हत्या, अपहरण, बलात्कार, विनयभंग असे एकामागेएक गुन्हे घडत आहेतच. पण गुन्हा नोंद न होण्याचा असा एकही दिवस नव्हता. मात्र जनता कर्फ्यूच्या दिवसाने त्याची कसर भरुन काढली.

कोरोना व्हायरसमुळे काल सर्व नागरिक जनता कर्फ्यूमध्ये सामील झाले होते. परिणामी भुरटे-सुरटे गुन्हेगार ही कोरोनाला धास्तावल्याने त्यांनी घर सोडले नाही. म्हणूनच आयुक्तालयाच्या इतिहासात एकाही गुन्ह्याची नोंद झाली नाही. अपवाद फक्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर कारवाई केली आहे.

जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संस्थेत वाढ होत आहे. सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. राज्यासह देशभरातील नागरिकांनी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महाराष्ट्रात लॉकडाऊन
दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने महाराष्ट्र लॉकडाऊन करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात 31 मार्चपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. लोकल ट्रेनसह इंटरसिटी ट्रेन, मेट्रो, एसटी बस आणि खासगी बस इत्यादी सेवा बंद करण्यात आल आल्या आहे. सोबतच मुंबईत आंतरराष्ट्रीय उड्डाणांची लॅण्डिंगवरही बंदी घातली आहे.

परंतु या दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. किराणा, दूध, भाजी इत्यादी दुकांनं सुरु राहतील. याशिवाय शेअर बाजार, बँका सुरु आहेत. मात्र कर्मचाऱ्यांची संख्या 25 टक्क्यांपेक्षा कमी असेल.

महाराष्ट्रात आतापर्यंत किती कोरोनाबाधित?
देशात आतापर्यंत 390 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यात आतापर्यंत 74 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यापैकी पाच जणांवर उपचार होऊन ते कोरोना निगेटिव्ह असल्याच समोर आलं आहे. तर मुंबईत दोघांचा मृत्यू झाला आहे.

#JanataCurfew | Drone View | लोणावळ्याच्या टायगर पॉईन्टवर शुकशुकाट