पिंपरी चिंचवड : भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या राजकारणात सॅन्डविच झालेल्या पिंपरी चिंचवडच्या महापौरांनी अखेर राजीनामा दिला. जगताप आणि लांडगे या दोन्ही आमदारांना महापौर नितीन काळजे पुरते वैतागले होते. आमदार लांडगे समर्थक काळजेसह उपमहापौर शैलजा मोरे यांनी ही आयुक्तांकडे राजीनामे सोपवले.


सव्वा-सव्वा वर्ष असे दोन ओबीसीचे महापौर देण्याचा निर्णय सुरुवातीलाच झाला होता. त्यानुसार 14 जूनलाच काळजे यांनी पदावरुन मुक्त होणं गरजेचं होतं. मात्र ते जगताप-लांडगे यांच्या कुरघोडीत ते महिनाभर लांबणीवर पडलं. काल शहरात आलेल्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर अखेर लांडगे यांनी महापौरांना राजीनामा देण्याचे आदेश दिले.

दुसरीकडे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना अभय देण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी टिळक यांच्या पदाला धोका नसल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे दोन लगतच्या शहरात भाजपची दुटप्पी भूमिका यानिमित्ताने समोर आली आहे.