पुणे : राज्याचा शहर विकास विभाग फुकटाला महाग आहे, अशा शब्दात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत असलेल्या खात्यावर टीका केली आहे.


चांदणी चौकातल्या नियोजित उड्डाणपुलाच्या भूमीपूजनानिमित्त ते आज पुण्यात बोलत होते. पुण्याचा विकास हवा असेल, त्याचा आराखडा एखाद्या बाहेरच्या एजन्सीला सोबत घेऊन करुन घ्या, तरच पुण्याचा विकास शक्य आहे, असं गडकरींनी म्हटलं आहे.

प्रदूषण रोखण्यासाठी पाण्यावरुन गेलं पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारकडून राष्ट्रीय महामार्ग दुप्पट केले आहेत. 10 नद्यांचा जलमार्ग बनवण्यात येत आहेत. शिवाय गंगेत विमान उतरवलं जाणार आहे. या प्रकल्पाचं काम सुरु आहे, अशी माहिती गडकरींनी दिली.

अधिकारी काम करत नसल्याने ही अवस्था झाली आहे. पैसे पडून आहेत, मात्र अधिकारी वेळेवर कामं करत नाहीत. पुण्यासाठी आता पायलट प्रोजेक्ट करायला तयार आहे. फक्त जागा मिळाली पाहिजे. आता रस्ते मोठे करता येणार नाहीत, मात्र मुळा-मुठा नदीत काम करायला राज्य सरकारने एनओसी द्यावी, ड्रायपोर्ट बांधून वाहतूक सुरु करु. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होईल, असंही गडकरी म्हणाले.