पुणे : फ्लोराईडचं मिश्रण असलेल्या पाण्यामुळे होणाऱ्या फ्लोरोसिस आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जे आदेश देण्यात आले होते, त्या आदेशांचं पालन न करणाऱ्या राज्यातील तब्बल 12 जिल्हाधिकाऱ्यांना अटक करुन हजर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादने दिले आहेत. त्यासंदर्भात जामीनपात्र वॉरंट संबंधित जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना पाठवण्यात आले आहे.
कोणत्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश?
1. नांदेड
2. चंद्रपूर
3. बीड
4. यवतमाळ
5. लातूर
6. वाशीम
7. परभणी
8. हिंगोली
9. जालना
10. जळगाव
11. नागपूर
12. भंडारा
या बाराही जिल्ह्यांमध्ये पाण्यासाठीच्या बोअरवेलचे प्रमाण जास्त आहे. दोन बोअरवेलमधील अंतर आणि खोली यासंदर्भात नियमावली आहे. मात्र त्यांचे पालन होत नसल्याची तक्रार करत अॅड. असीम सरोदे यांनी 2013 साली हरित लवादकडे याचिका दाखल केली होती.
फ्लोराईडमिश्रित पाण्यासंदर्भातील आदेशांची अंमलबाजवणी न झाल्याचे जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांकडून हरित लवादला सांगण्यात आले. शिवाय, काहीजणांनी उत्तरच दिले नाही. शिवाय, ज्यांनी उत्तरं दिली, त्यांची उत्तरं समाधानकारक नव्हती. त्यामुळे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यावेळी राष्ट्रीय हरित लवादने निष्काळजीपणाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांबाबत नाराजीही व्यक्त केली.