पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे.
घरामध्ये वाद-विवाद झाल्याने संबंधित तरुणी काल (14 डिसेंबर) रात्री उशिरा घरातून बाहेर पडली होती. आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी तिने रिक्षा पकडली. मात्र रात्रीच्या वेळी एकटी असल्याचा फायदा घेत रिक्षाचालकाने तिला एका निर्जनस्थळी नेलं. त्यानंतर आपल्या मित्रांना बोलावून तिच्यावर अत्याचार केला.
"आरोपींनी दारु पाजली आणि त्यानंतर तीन वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंधित केले. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारु अशी धमकीही दिली. शिवाय रिक्षातही एका आरोपीने छेडछाड केली. त्यानंतर कॅम्प परिसरातील एम जी रोडवर सोडलं," असं तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे.
शास्त्रीनगर पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून दोन आरोपींना अटक केली आहे. यातील एका आरोपीचं वय 31 वर्ष असून दुसरा 23 वर्षांचा आहे. तर एका आरोपीला पळून जाण्यात यश आलं आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.