पुणे : पुणेकरांना लवकरच कात्रजच्या उद्यानात वाघासोबत सिंहसुद्धा पाहायला मिळणार आहे. गुजरातमधील सक्करबाग प्राणी संग्रहालयाच्या वतीनं कात्रजमध्ये सिंहाची नर-मादी जोडी देण्यात आली आहे.
तेजस नावाचा नर आणि सूबी नावाच्या मादीचा जन्म 2010 मध्ये झाला. 7 वर्ष वयाचं हे जोडपं सध्या कात्रज उद्यानात चांगलंच रमलं आहे. दोघांना दिवसाला 8 किलो बीफ एवढं खाद्य लागतं. त्यासाठी महिन्याकाठी 25 ते 30 हजार रुपये खर्च येणार आहे.
राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील पाच विदेशी प्रजातीचे पक्षी सक्करबाग प्राणीसंग्रहालयास देण्यात आले आहेत. त्याबदल्यात ही नर-मादीची जोडी सक्करबाग प्राणीसंग्रहालयाने कात्रच्या प्राणीसंग्रहालयाला दिली आहे.
कात्रजच्या उद्यानात सद्यस्थितीत चारशेपेक्षा अधिक प्राणी आहेत. त्यात आता सिहांच्या या जोडप्याची भर पडल्यानं कात्रज उद्यानाची शान वाढली आहे.