पुणे : जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्लाचे देशभरात पडसाद उमटू लागले आहेत. जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ देशभरातील विद्यार्थी रस्त्यांवर उतरले आहेत. काल (06 जानेवारी) मुंबईतल्या विद्यार्थ्यांनीदेखील गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करुन आपण जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या पाठिशी आहोत, असा संदेश दिला. तसेच भ्याड हल्ल्याचा निषेध केला. पुण्यातही विद्यार्थी रस्त्यांवर उतरले आहेत. कालपासून या आंदोलनांमध्ये विद्यार्थी संघटना अग्रस्थानी होत्या. परंतु आता यामध्ये विविधी राजकीय पक्षांनीदेखील उडी घेतली आहे.


आज (07 जानेवारी) पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदाशिव पेठेतील कार्यालयाच्या नामफलकाला काळं फासलं. जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचललं आहे. जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामागे अभाविप असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे.


दरम्यान, जेएनयू हिंसाचाराच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच आंदोलन आझाद मैदानावर स्थलांतरित केलं होतं. आझाद मैदानावर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलन मागे घेतले असले तरी निषेध सुरुच राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. दरम्यान, या ठिकाणी आंदोलनाला कुठलीही परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं.


गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाची नसताना हे आंदोलन सुरू होते. तुम्हाला आंदोलनाचा अधिकार आहे. पण, या ठिकाणी नाही. त्यामुळे आंदोलन स्थलांतरित करण्याची विनंती पोलिसांकडून विद्यार्थी संघटनांना करण्यात आली होती. मात्र, विद्यार्थी संघटनांनी याला नकार देत आंदोलन सुरुच ठेवले होते. परिणामी पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेत आझाद मैदानात स्थलांतरित केलं. तरीही काही विद्यार्थी गेट वे ऑफ इंडियाच्या आसपास जमा झाली होती. आता हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे.


रविवारच्या रात्री जेएनयूमध्ये काय घडलं?
राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री काही गुंडानी वसतीगृहात घुसून विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला केला. मास्कधारी गुंडांनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी सळईने मुलींवरही हल्ला केला. यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशा घोष गंभीर जखमी झाली आहे. या हल्ल्याचा देशभरातून निषेध होत आहे. जेएनयू विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. दोन मिनीट 10 सेकंदच्या या व्हिडीओत मुलींच्या वसतीगृहात तोंडाला बांधलेले गुंड तोडफोड आणि धिंगाणा घालताना दिसत आहेत. वसतीगृहात मुली आक्रोश करतायेत. एक तोंडाला रुमाल बांधलेला गुंड मुलींना धमकावण्याच प्रयत्न करताना दिसत आहे. या सर्वच गुंडांकडे लाठ्या, काठ्या आणि लोखंडी सळई होत्या.


पुण्यातील गरवारे कॉलेजमध्ये अभाविपच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन | ABP Majha




 50 जणांवर गुन्हा दाखल पण अद्याप एकालाही अटक नाही | ABP Majha