पुणे : मंत्रिमंडळाचा विस्तार झाला याचा आनंद आहे, आम्ही विरोधाला विरोध करणारे नाही, राज्यातील अडचणी सुटावीत म्हणून आम्ही विस्तार करा, असं म्हणत होतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी हे सरकार पाडण्यासाठी बाहेरुन कोणी काही करण्याची गरज नसल्याचा टोला पाटील यांनी ठाकरे सरकारला लगावला.


या सरकारला खाली खेचण्याचा कोणताही प्रयत्न भाजपचा नाही. आम्ही प्रबळ विरोधीपक्ष म्हणून काम करेल. हे सरकार पाडण्यासाठी बाहेरुन कोणी काही करण्याची गरज नसल्याचं सांगत ऑपरेशन लोटसची चर्चा चुकीच्या असल्याचं सांगितलं. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात प्रमाणिकपणाचे राजकारण व्हायचे. यावेळी काय झालंय माहीत नाही. जसं अवकाळी पाऊस, गारपीट अनाकलनीय आहे. तसंच हे राजकारणही अनाकलनीय असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

जनतेला दूध का दूध, पाणी का पाणी हे कळलं. त्यामुळेच निवडून आलेल्या सदस्यांची मोठ बांधून आमच्याविरुद्ध जिल्हा परिषद निवडणुका आघाडीतील पक्ष लढत आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषद तशीच जिंकली, मात्र, नव्याने जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा चित्र उलट असेल. जनता आता भाबडेपणाने नव्हे तर सतर्कतेने मतदान करेल. सध्या राजकारणातील संतुलन बिघडलं असलं तरीही लोकांचा राजकारणावरचा विश्वास उडणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
ठाकरे सरकारचं अखेर खातेवाटप -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावित केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिल्याने अधिकृत खातेवाटप जाहीर झालं आहे. खातेवाटपात यादीनुसार बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल तर अशोक चव्हाणांकडे सार्वजनिक बांधकाम, नितीन राऊत यांच्याकडे उर्जा, तर, पहिल्यांदाच मंत्री बनलेल्या अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंना नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन, पर्यावरण खात्याची जबाबदारी दिलीय. तर राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख गृहमंत्री, छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा, दिलीप वळसे पाटील यांना राज्य उत्पादन शुल्क खातं मिळालं आहे.

संबंधित बातमी - मंत्रिमंडळ खातेवाटपाला राज्यपालांची मंजुरी, अधिकृत खातेवाटप जाहीर

Maharashtra Ministers portfolios | राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर | ABP Majha