पुणे: नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये (Assembly Election) अनेक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्षासाठी काम केल्याच्या तक्रारी पक्षांकडे आल्या होत्या. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरुवात करण्यात आली आहे. मावळ विधानसभेत विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात काम केलेल्या 8 पदाधिकाऱ्यांचे 6 वर्षासाठी पक्षाकडून निलंबन करण्यात आलं आहे.
कोणत्या नेत्यांवर कारवाई?
जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबूराव वायकर, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, खादी ग्रामोद्योग संघाचे माजी चेअरमन अंकुश आंबेकर, तळेगाव शहराध्यक्ष संतोष भेगडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुऱ्हे यांचा समावेश आहे. पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यासंबंधीचं पत्र देण्यात आलं आहे.
काय लिहलंय पत्रात?
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभेमध्ये सन्माननीय आमदार मा. श्री. सुनिल अण्णा शेळके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी दिलेली होती. या निवडणूकीमध्ये एक लाखाच्या फरकाने सुनिल अण्णा शेळके विजयी झाले.
या निवडणूकीमध्ये पक्षाचा आदेश डावलून १) बाबूराव वायकर २) सुभाष जाधव ३) सचिन घोटकुले ४) अकुश आंबेकर ५) शिवाजी असवले ६) संतोष भेगडे ७) संतोष मुऱ्हे ८) नामदेव शेलार वरील नेते व कार्यकर्त्यांनी मा. सुनिल अण्णा शेळके यांच्याविरुद्ध उघडपणाने प्रचार केला. पक्षाची शिस्त मोडली. पक्षाचा आदेश डावलला. त्यामुळे पक्षविरोधी कृती केल्यामुळे जाब विचारला असता वरील सर्वांनी पक्षश्रेष्ठीकडे राजीनामे सादर केले. त्यांनी दिलेले राजीनामे स्वीकारुन पक्षाने वरील नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यापुढे वरील व्यक्तीचा पक्षाशी कोणताही संबंध राहणार नाही, कृपया याची नोंद मावळ तालुक्यातील जनतेने घ्यावी, असं पत्रात म्हटलं आहे.