पुणे : अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी पुन्हा खासदार होऊन दाखवावं, अजित पवारांचे (Ajit Pwar) हे आव्हान अमोल कोल्हेनी स्वीकारलं. आता अजितदादांनी माझं आव्हान स्वीकारावं, अशी विनंती खासदार अमोल कोल्हे यांनी केलीये. अजित पवार यांना आव्हान देण्याइतका मी मोठा नाही. पण शेतकऱ्यांसाठी त्यांना माझं आव्हान आहे. अजित पवारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, असे आव्हान अमोल कोल्हे यांनी दिलेय. 


एबीपी माझासोबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, सरकार सोडवू न शकलेल्या समस्या मी शेतकरी आक्रोश मोर्चातून मांडतोय. त्यामुळं अजित दादांची चिडचिड होतेय का? हे तुम्ही त्यांनाच विचारा. असं म्हणत कोल्हे यांनी बारामती विधानसभेतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पाढा ही वाचला. सत्ता संघर्षावेळी जनता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेत गेल्याचं ते म्हणाले. ते मंत्री झाल्यावर त्यांचं जेसीबीतून पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत झालं. पण आता मात्र त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला. म्हणूनच आज शेतकरी मला कांदा, खर्डा-भाकरी देऊन साधपणाने स्वागत करतायेत अन त्यांचे प्रश्न मांडायला साथ देतायेत, असं कोल्हे म्हणालेत.  


शेतकऱ्यांसाठी अजित दादांनी कोणते आव्हान स्वीकारावे?


मी त्यांना हात जोडून आव्हान करतो की, त्यांनी शेतकऱ्यांना समस्येतून मुक्त करावं. कारण सत्ता संघर्षावेळी जनता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेत गेल्याचं ते म्हणाले. ते मंत्री झाल्यावर त्यांचं जेसीबीतून पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत झालं. पण आता मात्र त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला. म्हणूनच आज शेतकरी मला कांदा, खर्डा-भाकरी देऊन साधपणाने स्वागत करतायेत अन त्यांचे प्रश्न मांडायला साथ देतायेत, असं खासदार अमोल कोल्हे म्हणालेत.


शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांबाबत गांभीर्य आहे का? 


सातत्यानं शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जातायेत. जपान मधून ट्विट करत 2410 रुपयांचा दर देऊन कांदा खरेदी करणार, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे काम झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. मग दिल्ली वारी करता त्यावेळी फक्त सत्ता संघर्ष, मंत्री पदाचा विस्तार याबाबत त्यांच्याशी बोलता. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गप्प का बसतात, असे कोल्हे म्हणाले.  


जेसीबीद्वारे सत्कार स्वीकारणाऱ्यांना आता शेतकऱ्यांच्या हिताचा विसर पडला का?


आमच्या शेतकरी आक्रोश मोर्चात सत्ता संघर्षांत झाली तशी कुठं ही जेसीबी मधून पुष्पवृष्टी होत नाही. सर्व सामान्य शेतकरी साधेपणाने येऊन भेटतोय. कारण त्यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे, तो संकटात आहे. ज्या कारणासाठी हा सत्तासंघर्ष झाला त्याचा विसर आता त्यांना पडलाय, असा टोला कोल्हे यांनी लगावला. 


अजित दादा त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न सोडवू शकले नाहीत?


कांदा निर्यात धोरण प्रश्न मोठा आहे, याबाबत अजित दादांनी ठोस भूमिका घ्यायला हवी होती. अर्थ खाते त्यांच्याकडे आहे, त्यामुळं दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी सोडवायला हवा होता. 10 ते 12 रुपये दर पडले. अशावेळी सरसकट अनुदान आपण का देत नाही. जर हजारो कोटींचा खर्च जाहिरात बाजीवर होतो, मग शेतकऱ्यांच्या दुधाला का दर दिला जात नाही, असे कोल्हे म्हणाले.


मोर्चात स्वागतावेळी हार तुरे ऐवजी कांदा अन खर्डा-भाकर दिसतेय? 


माता माऊली आणि शेतकऱ्यांचं हे प्रेम आहे. म्हणून ते आम्हाला कांदा टोपली देतायेत, खर्डा-भाकरी खाऊ घालतायेत. हा साधेपणा जपत आम्ही केंद्रासमोर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतोय, असे कोल्हे म्हणाले. 


शेतकऱ्यांच्या हितासाठी अजित दादांना भेटणार का?


मोर्चा संपल्यावर मी नक्कीच अजित दादांची भेट घेणार. त्यांच्यासमोर शेतकऱ्यांचे प्रश्न सविस्तरपणे मांडणार आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.