पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर झालेल्या कथित गोळीबारात आणखी माहिती समोर येत आहे. अटकेत असलेल्या कंत्राटदार अँथोनी यांचे मॅनेजर तानाजी पवारने जीव वाचवण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केल्याचा जबाब दिलाय. अशी पोलिसांमधील खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलीये. आमदार अण्णा बनसोडेंनी मात्र त्यांच्या दिशेने गोळीबार केल्याचा दावा केला होता. मात्र घटनेला आठ तास उलटून गेल्यानंतरही पिंपरी चिंचवड पोलिसांना गोळी लागल्याच्या खुणा अद्याप सापडलेल्या नाहीत, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलीये. तानाजी पवार यांचा जबाब आणि पोलिसांना गोळीच्या खुणा न सापडणं या दोन्ही बाबी आमदारांचा दावा तूर्तास तरी फोल ठरवत आहेत. अशातच आमदारांनी तानाजी पवार यांच्याशी काल साधलेल्या संवादाची ऑडिओ क्लिप देखील समोर आलीये. यात आमदार अण्णा बनसोडे हे तानाजी पवारला धमकावत आहेत. 


पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार


नेमकं काय संभाषण झालं?


आमदार : जहागीरदार तुला बोलावलेलं कळत नाही का? एवढे फोन केले उचलत नाहीस, कमीतकमी येऊन तर जा ना? 


तानाजी पवार : मी काल फोन केला होता, तुम्ही फोन उचलला नाही. आपण योग्य भाषा वापरा, जहागीरदार वगैरे म्हणण्याची भाषा योग्य नाही. तुम्ही आमदार साहेब आहात म्हणजे आम्ही काहीही ऐकून घ्यायचं का? 


आमदार - ( शिवीगाळ करायला सुरुवात केली.) एक काम कर तू कुठं आहे सांग मी तिथं येतो. 


तानाजी पवार : साहेब मी मुंबईत आहे. पण आपण शिवीगाळ करायची गरज नाही. तुमचं काम काय अडलंय हे सांगा.


आमदार : तुझा मालक आजूबाजूला आहे का? 


तानाजी पवार : यात मालकाचा काय संबंध आहे, मी मुंबईत माझ्या कामासाठी आलोय. 


आमदार : नाही नाही सांगतो ना तुझ्या मालकाला. घे रे तो मोबाईल.


तानाजी पवार : बोला, बोला तुम्ही माझ्या मालकाशी बोला. काही अडचण नाही. ही तुमची भाषा ना एका जनप्रतिनिधीला शोभत नाही. आम्ही तुमच्याशी इज्जतीने बोलतोय आणि तुम्ही शिव्या देताय. 


आमदार : (पुन्हा शिवीगाळ)


तानाजी पवार : आपण काय बोलताय हे आपल्याला तरी कळतंय का? 


आमदार : तू काय बोलतो हे तुला कळतं का? 


तानाजी पवार : मी काय बोलतोय तेव्हा


आमदार : तू मालक नाही, कामगार आहे.


तानाजी पवार : मी कुठं म्हणतोय मालक आहे. तुम्ही शिव्या कशाला देताय.


आमदार : बरं तू ये उद्या.


तानाजी पवार : येतो मी उद्या.


असं या संभाषण झालं आणि आज तानाजी पवार आमदारांना भेटायला त्यांच्या कार्यालयात आले. त्यानंतर इथं ही वादावादी झाली. आमदारांच्या कार्यकर्त्यांनी तानाजी पवारला मारहाण करत, कार्यालयाबाहेर आणलं. तेव्हा तानाजी पवारने त्याच्याकडे असणाऱ्या बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या. ह्या गोळ्या माझ्या दिशेने झाडल्याचा दावा आमदारांनी तातडीनं केला. मात्र अद्यापही गोळीबाराच्या खुणा पोलिसांना आढळल्या नाहीत, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलीये. अशातच घटनेनंतर अटकेत असलेल्या तानाजी पवारांनी आमदारांचे कार्यकर्ते मला बेदम मारहाण करत होते. माझा जीव जाण्याची शक्यता होती, म्हणून बचावासाठी मी हवेत गोळीबार केल्याचं तानाजी पवारने जबाबात म्हटलंय. अशी पोलिसांमधील खात्रीलायक सूत्राने माहिती दिलीये. त्यामुळे आमदारांचा स्वतःवर गोळीबार झाल्याचा दावा तूर्तास फोल ठरला आहे. अशातच काल झालेल्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला. यात अँथोनी यांच्या कार्यालयात आमदारांचे समर्थक आले होते. त्यांनी अँथोनी यांच्या कर्मचाऱ्यांवर शस्त्राने हल्ला केला होता. हा प्रकार गोळीबारानंतर आमदारांनी सांगितला नव्हता. आमदारांच्या कर्मचाऱ्यांना कामावर घेत नसल्याने हे प्रकार घडल्याचं प्रथमदर्शनी समोर येतंय. पण आता परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती पोलीस कृष्ण प्रकाश यांनी दिली.