Raj Thackeray Pune Rally News Updates : मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात आज सकाळी 10 वाजता ही सभा होणार आहे. पुण्यात होणाऱ्या या सभेआधी राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. यानंतर राज ठाकरे यांनी दौरा रद्द केल्याची घोषणा केली. गेले काही दिवसांपासून राज्य सरकार राज ठाकरेंच्या निशाण्यावर आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सभेत राज ठाकरेंवर निशाणाही साधला होता. त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे यांच्या निशाण्यावर प्रामुख्यानं राज्य सरकार, भाजप सरकार बृजभूषण सिंह असण्याची शक्यता आहे. सोबतच आगामी निवडणुकांच्या संदर्भात देखील राज ठाकरे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
 
राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. या सभेबाबात राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांच्यासोबत बैठक घेतली. बाळा नांदगावकर यांनी सांगितलं होतं की, नदीपात्रात सभा होणार असल्याचं निश्चित झालं होतं. हवामान खात्याचा अंदाज पाहता पाऊस कधीही येऊ शकतो. अशा परिस्थितीत अचानक पाऊस आला तर हजारो लोकांना त्रास होईल. यामुळे 21 ऐवजी 22 मे रोजी गणेश कला क्रीडा मंच इथे सकाळी दहा वाजता सभा घेण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला. 


राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौरा करणार होते. मात्र राज ठाकरे यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध केला होता.  राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी त्यांच्यावर टीका केली  होती. "माफी न मागून राज ठाकरे यांनी जुन्या जखमा ताज्या केल्या," असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं होतं. उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला होता.  


राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया
राज ठाकरे येत्या 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी आपला दौरा स्थगित केला. राज ठाकरे यांच्या पायावर मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला शस्त्रक्रिया होणार आहे. राज यांच्या पायाचं दुखणं वर्षभरापूर्वीचं आहे. परंतु जुनं दुखणं पुन्हा बळावल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली. राज ठाकरे यांच्यावर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे.