Raj Thackeray Pune Rally vasant More news : मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात आज सकाळी 10 वाजता ही सभा होणार आहे. मात्र या सभेआधी मनसेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी एक फेसबुक लाईव्ह करुन नाराजी बॉम्ब टाकला आहे.  मी मनसेची पुण्यात उभारलेली टीम पक्षातीलच काही पार्ट टाईम लोकांना नकोय, अशा शब्दात राज ठाकरेंच्या सभेआधी वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज साहेबांना त्रास होईल, अशी काम काही पार्ट-टाईम कार्यकर्ते करतायत, असंही मोरे यांनी म्हटलं आहे. 


आपल्या फेसबुक लाईव्हवरुन त्यांनी म्हटलं आहे की,  माझं दुर्दैवं आहे की मला सारखं का सांगावं लागतंय की मी मनसेत आहे. कुणीतरी यामागे आहे. कुणीतरी या सगळ्या गोष्टी घडवून आणतं आहे. मला जाणून बुजून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. मी राज ठाकरेंसमोर या गोष्टी मांडणार आहे. या गोष्टी राज ठाकरेंपर्यंत गेल्याच नसतील. त्यांना इथे काय चाललंय ते माहितीच नसेल,असं मोरे यांनी म्हटलं आहे. 


झारीतले शुक्राचार्य शोधले पाहिजेत
त्यांनी म्हटलं की, मी याबाबत पुण्यातील पक्षाच्या नेत्यांच्या कानावर गोष्टी घालतोय. गेल्या महिन्या-दीड महिन्यापासून मला सांगायला लागतंय की मी मनसेत आहे. हे झारीतले शुक्राचार्य शोधले पाहिजेत. त्यांच्यावर कारवाया व्हायला पाहिजेत. कोण पक्षातून कुणाला बाहेर घालवायला बघतंय त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं. 
 
मतभेद कुठेतरी मनभेदापर्यंत जायला लागले आहेत


वसंत मोरे यांनी म्हटलं आहे की, मला राज ठाकरेंनी याबाबत विचारणा केली, तर मी त्यांना सांगेन. कारण संयम तुटण्याची वेळ कधीकधी येते. माझ्यापर्यंत विषय होता, तेव्हा मी सगळ्या गोष्टी रेटून नेत होतो. पण आज माझ्या कार्यकर्त्यांपर्यंत विषय आला आहे. मला वाटतं पदाधिकारी हा पदाधिकारी असतो. तो कधीच कुणाचा नसतो. तुम्ही त्याला व्यवस्थित वागणूक दिली, तर तो तुमच्यासोबतच असतो. इथे वसंत मोरे किंवा अजून कुणाचा ग्रुप नाही. तो पक्षाचा ग्रुप आहे. राज ठाकरेंना मानणारा ग्रुप आहे. पक्षात मतभेद असतात. पण आता मतभेद कुठेतरी मनभेदापर्यंत जायला लागले आहेत. ते जाऊ नयेत यासाठी मी प्रयत्न करतोय. पण वेगवेगळ्या माध्यमातून हे दाखवलं जातंय की आम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवायचंय, असंही त्यांनी म्हटलं आहे. 


लाईव्हमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, निलेश माझिरे, वसंत मोरे शिवसेनेत प्रवेश करणार हे ऐकल्यावर माझ्यापेक्षा जास्त धक्का माझिरेंना बसला. निलेश माझिरे हा पुणे शहरातला माझ्यानंतरचा प्रसिद्ध असलेला चेहरा आहे. निलेश माझिरे एक शहराध्यक्ष आहे. त्याने एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर या अफवा पसरवण्यात आल्या. या कोणी पसरवल्या मला माहित नाही, पण खोट्या बातम्या पसरवून एका झटक्यात निलेश माझीरे यांच्याकडून माथाडी कामगार सेनेचे अध्यक्षपद काढून घेण्यात आले,असं मोरेंनी म्हटलं आहे.