पुणे : ह्युंडई कार कंपनी  (hyundai car company)आज जगभरात बघायला मिळते. मात्र ही कंपनी महाराष्ट्रातून तामिळनाडू राज्यात कशी गेली, याचा किस्सा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Shrad Pawar) सांगितला. पुण्यातील सिंबायोसीस कॉलेजमध्ये अभियंता दिवस (Engineer's Day) साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शरद पवारांनी हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात त्यांनी ह्युंडई कारसोबतच अनेक जुने किस्से सांगितले आणि देशाला कुशल इंजिनिअरची गरज असल्याचेही नमूद केले. 


शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले की, दर वर्षी मी काही महिने वॉशिंग्टनला जात असायचो. त्याच ठिकाणी एका सहकाऱ्याने माझी ओळख  चार्स्ल हे हॉंग नावाच्या गृहस्थाशी करुन दिली होती. चार्ल्स हे कोरीयन होते. त्यांनी ओळख करुन दिल्यानंतर आम्ही अनेकदा भेटायचो आणि बोलायचो. मला त्यांच्याबाबत आस्था वाटत होती. त्यावेळी त्यांना मी भारतात बोलवलं होतं. त्यांची आणि जेआरडी टाटा यांची भेट घालून दिली होती. त्याचवेळी हॉंगने सांगितलं ही ज्या टेल्को सारख्या पद्धतीचं युनिट उभं राहिलं त्या भारताच्या अभियंतांची क्षमता चांगली आहे. त्यामुळे हे अभियंता भारताला जगाच्या कोणत्याही सर्वौच्च ठिकाणी नेऊन पोहचवतील.


 बारामतीच्या संग्रहालयात चार्स्ल हे हॉंगचे फोटो


चार्स्ल हे हॉंग आता हयात नाहीत. मात्र, बारामतीच्या माझ्या संग्राहालयात त्यांच्यासोबतचे फोटो पाहायला मिळतील. भारतातून परत गेल्यावर त्यांनी गाड्यांवर काम करायला सुरुवात केली. वेगवेगळे पार्ट्स बनवले.  त्यावेळी ते  म्हणाले होते, की एक दिवस माझ्या गाड्या भारताच्या रस्त्यावर धावणार आणि सर्वसामान्यांना परवडणारी ही कार असेल आणि अमेरिकेतदेखील ती कार तेवढीच प्रसिद्ध असेल. त्याच कंपनीचं नाव ह्य़ुंडाई आहे. 


...म्हणून ह्य़ुंडाई कंपनी महाराष्ट्रातून तामिळनाडूत गेली


पवार यांनी किस्सा सांगताला म्हणाले की, ह्युडाईचं युनिट महाराष्ट्रात काढ म्हणून मी त्यांना सांगितलं होतं. त्यावेळी ते मान्य झाले आणि तयारी देखील सुरु झाली. त्यांना भारतात बोलवलं काही जागादेखील दाखवल्या. मात्र त्याकाळात राजकीय स्थिती सोयीची नव्हती. त्यावेळच्या राज्यकर्त्यांचा वेगळा दृष्टीकोन होता. त्यावेळी महाराष्ट्रात ह्युडाईचं  काम करायचं नाही, असं राज्यकर्त्यांनी सांगून टाकलं होतं. मात्र भारतात हे युनिट यायला पाहिजे, असा माझा हट्ट होता. त्यावेळी माझे आणि जयललिता यांचे संबंध चांगले होते. त्यावेळी हॉंग आणि जयललिता यांची भेट घालून दिली. त्यांनी एकाच मिटींगमध्ये जयललिता यांनी 1000 एकर जमीन दिली आणि सगळ्या परवानग्या दिल्या. त्यामुळे महाराष्ट्रातलं ह्युडाईचं युनिट तामिळनाडूत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, शरद पवार यांनी ह्युंडाईचा प्रकल्प नेमका कोणत्या वर्षात गेला, हे सांगितले नाही.