Sharad Pawar: शरद पवार (Sharad Pawar) हे राज्याच्या राजकारणातील बर्म्युडा ट्रँगल (Bermuda Triangle) असून त्यांच्याजवळ जाणारा संपला आहे. हवंतर त्यांचा राजकीय इतिहास तपासा, अशी टीका शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केली आहे. शिवसेना संपवायला शरद पवार जबाबदार असून त्यांना यातून स्वत: चा फायदा करून घ्यायचा होता, असेही शिवतारे यांनी म्हटले. त्यांना शिवसेना-भाजप युती नको हवी होती. यासाठी पवार यांनी भाजपला (BJP) 2014 मध्ये बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचे ही शिवतारे यांनी म्हटले.
माजी आमदार आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी शरद पवार यांच्या जोरदार टीका केली. निवडणूक आयोग घेणार असलेला निर्णय शरद पवार यांना अपेक्षित होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी निवडणूक आयोगाचा जो निर्णय येईल, त्याचे स्वागत करायला हवे असे म्हटले होते. हे मोठे नेते कोणते डाव टाकतील हे सांगता येत नसल्याचे शिवतारे यांनी म्हटले.
शरद पवार यांनी कधीही शिवसेनेशी जुळवून घेतले नाही. शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री असली त्यांचे राजकीय मतभेद होते. उद्धव ठाकरे हे सत्तेच्या मोहातून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना संपवत शरद पवार यांच्याकडे जाऊन बसले. शरद पवार हे राजकारणातील बर्म्युडा ट्रँगल आहेत. त्यांच्याजवळ गेलेले सगळे संपले. हा इतिहास तुम्ही पाहा, असेही शिवतारे यांनी म्हटले. पुढे त्यांनी म्हटले की, वर्ष 2019 मध्ये एकही उमेदवार नसताना राज ठाकरे यांना पुढे करत 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणायला लावला. त्यानंतर राज ठाकरे यांची गरज संपल्यावर त्यांना दूर झटकले असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या भोळेपणाचा फायदा शरद पवार आणि अजित पवार यांनी घेतला असल्याचे सांगत पवार यांचा डाव काल यशस्वी झाल्याचा दावा शिवतारे यांनी केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती तोडा हे सांगायला 16 आमदार आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आमदारांना तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही जा, असे सुनावले. काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांच्यावर काय भानामती केली असेही शिवतारे यांनी सांगितले.
शरद पवारांवर नियती सूड उगवणार
निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय दुर्दैवी असल्याचे विजय शिवतारे यांनी म्हटले. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. शरद पवार यांनी केलेल्या कृत्यावर नियती तुमच्यावर सूड उगवेल असा संतापही शिवतारे यांनी व्यक्त केला. शिवसेना एक विचार असून ती इमारत नाही. आम्ही विचारायचे वारसदार आहोत. आज ना उद्या शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आम्हाल मिळेल अशी आम्हाला आशा असल्याचे त्यांनी म्हटले.
मुलगा कसा पडला, याचा विचार करा; अजित पवारांना टोला
अजित पवार यांनी तू निवडून कसा येतो हे म्हणण्यापेक्षा मुलगा कसा पडला याचा विचार करावा असे टोलाही शिवतारे यांनी लगावला. अजित पवार यांनी माझ्याविरोधात कटकारस्थान करून मला पाडलं. याबाबत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या अन्य नेत्यांनादेखील सांगितले. अजित पवार मिशी पिळून बोलतात. देशातील अनेक नेते उच्चपदावर गेले. पण, शरद पवार पंतप्रधान का झाले नाहीत, असा सवालही शिवतारे यांनी उपस्थित केला. पार्थ पवार विरोधात केलेल्या प्रचाराचा राग अजित पवार यांनी माझ्याविरोधात काढला. अजित पवार यांनी मला खूप त्रास दिला. राजकारणच नाही तर त्यांनी उद्योगातही त्रास दिला असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.