Mohan Bhagwat News :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ब्राम्हण समाजाने भूतकाळातील चुकांबद्दल पापक्षालन करायला हवे असं नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं. सरसंघचालकांच्या या वक्तव्याचे आज राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात देखील जोरदार पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. काहींनी सरसंघचालकांचे हे वक्तव्य हे प्रागतिक असून त्याच स्वागत व्हायला हवं असं म्हटलं तर काहींनी तशी कृती करण्याचं आवाहन केलं आहे. 


नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत त्यांनी ब्राम्हण हा जन्माने नाही तर क्रमाने ठरत असतो. धर्मशास्त्रात देखील हेच सांगितलं आहे. मात्र मधल्या काळात जातीभेदाचे चौकट घट्ट झाली आणि मानवाला मान खाली घालायला लावणारे कृत्य घडले . त्यामुळं आपण पापक्षालन करायला हवं असं म्होऊन भागवत म्हणालेत.   मोहन भागवतांच्या या वक्तव्यावर ब्राम्हण संघटनांनी प्रतिक्रिया देताना पापक्षालन म्हणजे नक्की काय करायचं हे देखील भगवंतानी सांगावं असं म्हटलंय . तर काही ब्राम्हण संघटनांनी मोहन भागवतांच्या वक्तव्याचा संघाच्या पुण्यातील मुख्यालयात निवेदन देऊन निषेध नोंदवलाय. 


मराठा महासंघाने मोहन भागवतांच्या  वक्तव्याचं स्वागत


मराठा महासंघाने मात्र मोहन भागवतांच्या या वक्तव्याचं स्वागत केलंय. नरेंद्र दाभोळकर , लोकमान्य टिळक, आगरकर अशा ब्राम्हण समाजातील अनेक समाजसुधारकांनी हीच भूमिका मांडली होती आणि समाजातील भेदांच्या चौकटी तुटण्यास त्यामुळं मदत होईल असं म्हटलंय. इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी मात्र आत्ता पापक्षालन करून काही होणार नाही असं म्हटलंय. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंवसेवक संघाला जर खरच जातीभेदाचे निर्मूलन करायचे असेल तर वैदिक धर्म सोडावा असं आव्हान केलंय. वैदिक धर्म वेगळा आणि हिंदू धर्म वेगळा आहे त्यामुळं वैदिक धर्म नाकारल्याचं भागवतांनी जाहीर करावं असं संजय सोनवणींनी म्हटलंय. भागवतांच्या या वक्तव्यावर राजकारण तर होणारच . राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य नको तर प्रत्यक्ष कृती करून दाखवा असं आवाहन केलंय.


 मोहन भागवतांच्या वक्तव्याचा ब्राह्मण महासंघाकडून निषेध
पिढ्यानपिढ्या अत्याचारांबाबत जबाबदार समाजानं पापक्षालन करावं या सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्याचा ब्राह्मण महासंघानं निषेध केला आहे. ब्राह्मण महासंघानं पुण्यात संघाच्या कार्यालयात निवेदन देऊन सरसंघचालकांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. ब्राह्मण समाजाला कळत नकळत वेगळं पाडण्याचा उद्देश आहे, असं ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटलं आहे.  आतापर्यंत ज्यावेळी समाजावर संकटं आली त्यावेळी ब्राह्मण समाजचं संकटासमोर उभा राहिलेला आहे. आमच्यासाठी मोहन भागवत हे आतिशय आदरणीय व्यक्तीमत्व आहे. त्यांनी जर समाजाला काही संबोधित केलं असेल  मान्य आहे. मात्र पापक्षालन करावं म्हणजे नेमकं काय करावं हे त्यांनी सांगितलं पाहिजे, असा सवाल ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. पापक्षालन करणं याचा अर्थ म्हणजे चूक केल्याचं मान्य केल्यासारखं आहे. काही व्यक्तींकडून निश्चित चुका झाल्या असतील. मात्र त्याच समाजातील काहींनी त्याचा निषेधदेखील केला आहे आणि समाज पुढे येण्यासाठी देखील त्यांनीच प्रयत्न केला आहे. त्यामुळे भागवतांनी त्याचाही विचार करायला हवा होता. अमेरिकेत गुलामगिरी होती, लोकं विकली जात होती मात्र तिथे आजपर्यंत असं पापक्षालन करावं असं कोणीच बोललेलं नाही. त्यादेशातील काळ्या लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता त्यावेळीदेखील असं बोललं गेलं नाही मात्र अनेक वर्षांपासूनची घटना बाहेर काढून हिंदू समाजात मतभेद निर्माण करायचे आणि ब्राह्मण समाजाला वेगळं पाडायचं.


भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटानेही भागवतांच्या या वक्तव्याचे स्वागत केलंय. मात्र त्यावर राजकारण करण्यात येऊ नये असं म्हटलंय. हिंदू आणि मुस्लिमांचे डी एन ए हे एकच आहेत असं वक्तव असो किंवा मशिदीत जाऊन मुस्लिम धर्मगुरुंशी संवाद करणं असो. गेल्या काही काळात मोहन भागवतांनी केलेली वक्तव्य आणि कृती या चर्चेचा विषय बनली आहेत.  


इतर महत्वाच्या बातम्या


सरसंघचालकांचं महत्वाचं वक्तव्य; म्हणाले, 'मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरूपात आपल्याच लोकांना वागवले हा आपला इतिहास'


RSS Chief Mohan Bhagwat: असंतुलित प्रमाणात लोकसंख्या वाढ झाली की देशाची विभागणी होते; सरसंघचालकांचा इशारा