Pune By Election : पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ येथील पोटनिवडणुका महाविकास आघाडी लढवण्यावर ठाम असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज स्पष्ट केले. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, 'मी गुरुवार आणि शुक्रवारी पुण्याला असेल. माझ्याकडे सात ते आठ व्यक्तींनी उमेदवारी मागितला आहे. मला मिञ पक्षासोबत बोलावं लागेल. त्यानंतर आम्ही निर्णय घेणार आहोत. शिवसेनेसोबत आम्ही चर्चा केली आहे. उद्या आमदारांची आमची बैठक आहे. त्यामध्ये देखील आम्ही स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार आहोत.'
चिंचवड व कसबा या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक लढवण्यासाठी आम्ही ठाम आहोत असे सांगतानाच कोल्हापूर, पंढरपूर, नांदेड देगलूरमध्ये निवडणुका झाल्या आहेत. याची आठवण अजित पवार यांनी करुन दिली. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु त्याप्रकारे आम्ही विचार करत नाही असेही अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे चिंचवड विधासभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळेच चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबात चर्चा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
प्रत्येकाला आपापली तयारी करण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीसंदर्भात कॉंग्रेसचे नेते आले नव्हते मात्र आमची व उद्धव ठाकरे यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. मी गुरुवार आणि शुक्रवार पुण्यात आहे. त्यावेळी चिंचवडसाठी आतापर्यंत माझ्याकडे नऊ लोकांनी उमेदवारी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मागितली आहे. याबाबत त्यांच्याशी समोरासमोर बोलणार आहे. त्यानंतर कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या व आमच्या वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. तीच गोष्ट कसब्याबाबत आहे. कॉंग्रेस तयारी करत असेल कदाचित पाठीमागील विधानसभा झाल्या त्यावेळी आघाडीत (त्यावेळी महाविकास आघाडी नव्हती) ही जागा कॉंग्रेसला सोडण्यात आली होती. पुण्यात गेल्यावर माझ्या लोकांशी व कॉंग्रेससह शिवसेना व इतर मित्रपक्षांशी चर्चा करेन असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
प्रकाश आंबेडकर यांनी मोदी - शहा यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, राजकीय व्यक्तीने किंवा नागरिकांने काय म्हणावे यावर केलेल्या वक्तव्याबद्दल मला प्रश्न विचारता. ते आमचं मत नाही ते त्यांचे मत आहे, त्यांनी व्यक्त केले आहे. त्यावर आम्ही वक्तव्य करण्याचे कारण नाही, त्यावर नो कमेंट्स अशा शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.