कॅन्सरच्या आतापर्यंत पुढे न आलेल्या कारणांचा पुण्यातील संशोधकांकडून शोध
एबीपी माझा वेब टीम | 17 Oct 2018 05:47 PM (IST)
कॅन्सर ही भारतासह जगासाठी गंभीर समस्या आहे. कॅन्सरची नेमकी कारणं माहित नसल्यामुळे त्याच्यावर योग्य उपचार करणंही शक्य होत नाही. पण आता पुण्यातील संशोधकांनी आतापर्यंत पुढे न आलेली कारणं शोधली आहेत.
पुणे : कॅन्सर हा शब्द ऐकताच मनात भीती भरते. कॅन्सरचं लवकर निदान करून त्यावर वेळीच उपचार सुरू झाले तरच त्यावर मात करणं सोपं होतं. ज्या कारणांमुळे कॅन्सर होतो त्यातील आतापर्यंत पुढे न आलेल्या कारणांचा शोध पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (एनसीसीएस) म्हणजेच राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र येथील संशोधकांनी लावलाय. आजपर्यंत ज्ञात असलेल्या कर्कजनुकांपेक्षा वेगळ्या आणि किती तरी अधिक आव्हानात्मक तसेच गंभीर घटक शोधण्यात एनसीसीएसच्या शास्त्रज्ञांना यश आलं आहे. दहा वर्षांच्या संशोधनानंतर हे यश मिळालं आहे. हे संशोधन प्रामुख्याने उंदरांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सर पेशींवर केलं गेलंय. त्यामध्ये प्रामुख्याने ब्रेन ट्यूमर, लिंफोमा आणि ल्युकेमिया (ब्लड कॅन्सर) या कॅन्सरपेशींवर हे संशोधन करण्यात आलंय. तर मानवामध्ये आढळणाऱ्या प्रोस्टेट कॅन्सरमध्येही या संशोधनातील साधर्म्य आढळून आलंय. कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या आणि पेशीमध्ये आढळणाऱ्या या नॉन कोडिंग प्रोटीनच्या घटकाला त्यांनी 'जिनिर' असं नाव दिलंय. सध्या प्राथमिक अवस्थेत असलेल्या या संशोधनाचं महत्त्व मात्र खूप आहे. कारण कॅन्सर हा जगातील दुसऱ्या नंबरचा जीवघेणा आजार आहे. खालच्या आकडेवारीवरून त्याची भीषणता पुढे येते. भारतासह जगभरातील कॅन्सरची परिस्थिती 2018 साली जगभरात 96 लाख मृत्यू हे कॅन्सरमुळे होतील असा अंदाज जागतिक आरोग्य संस्थेने (WHO) वर्तवला आहे. जगात होणाऱ्या सहा मृत्यूंपैकी एक मृत्यू हा कॅन्सरमुळे होतो. जगातील कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 70 टक्के मृत्यू हे गरीब देशांमध्ये होतात. तर भारतातील आकडेवारीही भयावह आहे. भारतात सध्या 25 लाख लोक कॅन्सरसोबत झगडत आहेत, असं नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर परिव्हेन्शन अँड रिसर्चची आकडेवारी सांगते. भारतामध्ये नवीन दोन महिलांना जर ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं तर त्यातील एका महिलेचा मृत्यू होतो. भारतामध्ये तंबाखूमूळे होणाऱ्या आजारांमुळे दररोज 2500 लोकांचा मृत्यू होतो. भारतात दरवर्षी सात लाखांपेक्षा जास्त नव्या कॅन्सरच्या रुग्णांची नोंदणी होते. भारतात पुरुषांचा तोंडाचा कॅन्सर आणि फुप्फुसाचा कॅन्सर, तर महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सरमुळे जास्त मृत्यू होतात. जर वेळीच या कॅन्सरचं निदान झालं आणि उपचार झाले तर हे मृत्यू थांबवता येतील. कॅन्सरवर नियंत्रण शक्य 10 वर्ष हे संशोधन सुरू होतं. महत्त्वाचं म्हणजे यातील 12 संशोधकांपैकी सात महिला संशोधक आहेत. एनसीसीएसच्या या संशोधनामुळे पुढच्या काळात कॅन्सरवर प्रभावी उपचार शक्य होतील, असं संशोधकांचं म्हणणं आहे. या संशोधनामुळे लगेचच कॅन्सर उपचार जरी शक्य होणार नसले तरीही या कारणामुळे होणाऱ्या कॅन्सरला प्रतिबंध घालणं शक्य होईल आणि उपचार होऊ शकतील. पण त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. त्यामुळे एनसीसीएसच्या संशोधकांसाठी आता पुढचा टप्पा अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.