पुणे : पुण्याजवळील महामार्गांवरील अपघात थांबायचं (Pune Accident News) नावच घेत नाही आहे. त्यात बसच्या अपघातांचं प्रमाण अधिक आहे. आजच सकाळी पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही बसचा अपघात झाला. नारायणगाव बायपासला समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी शिवशाही चालकाने बस विरुद्ध दिशेला घेऊन जात असताना कंटेनर आणि शिवशाही बसचा अपघात झाला. या अपघातात 14 प्रवाशी किरकोळ जखमी झाले.
दरम्यान, अपघातग्रस्त बसचे दरवाजे अचानक लॉक झाल्याने समोरील काच फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. जखमींना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाने अपघाताचा मोठा अनर्थ टळल्याची भावना काही प्रवाशांनी व्यक्त केली.
अपघात झाल्यावर अनेक प्रवासी बाहेर काढणं हे मोठं आव्हान होतं. यावेळी पुणे नाशिक महामार्गावर मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळालं होतं. सगळे प्रवासी जीव मुठीत घेऊन बसच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. यावेळी स्थानिकांनीदेखील त्यांना मदत केली. किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांवर उपचार सुरु आहेत.
पुणे नाशिक महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलं!
पुणे नाशिक महामार्गावरील अपघाताचं प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी पुणे नाशिक महामार्गावरील खेड तालुक्यातील शिरोली फाट्याजवळ भीषण अपघात झाला होता. महामार्ग ओलांडताना एका चारचाकी गाडीने धडक दिल्यानं ही घटना घडली होती. यात पाच महिलांचा मृत्यू झाला होता. 13 महिलादेखील जखमी झाल्या होत्या. एका लग्नकार्यात काम करण्यासाठी 17 ते 18 महिला स्वारगेटवरून पीएमपीएमएल बसने खेड तालुक्यात आल्या होत्या. शिरोली फाट्याजवळ त्या उतरल्या, मात्र अंधारात त्यांना महामार्ग ओलांडायचा होता. पुण्याच्या दिशेने आलेल्या चारचाकीने आधी एका महिलेला धडक दिली होती. त्यानंतर गाडीवरचा ताबा सुटला आणि इतर सात महिलांना ही त्याने धडक दिली होती. यात दुर्दैवाने पाच महिलांना जीव गमवावा लागला होता.
अपघात कधी थांबणार?
पुणे जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यात अनेकांचे नाहक जीव जात आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वेग, रस्ते या अपघातासाठी कारणीभूत ठरत असल्याचं आतापर्यंतच्या अपघातातून समोर आलं आहे. योग्य उपाययोजना राबवून हे अपघात रोखणं प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :